ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये त्याच्या आईचेही तितकेच मोलाचे योगदान असते. आईदेखील तितकेच कष्ट घेते. पण अनेकदा आईचे कष्ट दुर्लक्षित रहातात आणि फक्त वडिलांचेचं नाव घेतले जाते. आईचे करीयरमधील हेच योगदान लक्षात आणून देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील तीन मोठया खेळाडूंनी एक वेगळा अनोखा मार्ग निवडला.
महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आपल्या जर्सीवर स्वत: ऐवजी आईचे नाव लिहून आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. स्टार प्लसच्या 'नई सोच' या अभियानामध्ये हे तिन्ही क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. या तिघांवर व्हिडीओ चित्रीत करण्यात आला असून, त्यामध्ये या तिघांनी आईने घेतलेल्या कष्टामुळे आपण इथवर पोहचू शकलो असा संदेश दिला आहे.
धोनीच्या जर्सीच्या पाठिमागे त्याची आई देवकी, कोहलीच्या जर्सीवर त्याच्या आईचे सरोज आणि रहाणेच्या जर्सीवर सूजाता अशी नावे आहेत. १६ ऑक्टोंबरला भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेपासून या अभियानाला प्रारंभ झाला. महिलांप्रती दृष्टीकोन बदलण्याचा नयी सोचचा उद्देश आहे.