भारताच्या नीरज चोप्रा हा खऱ्या अर्थाने जगज्जेता झाला... बुडापेस्ट येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. क्रिकेट सोडून अन्य खेळासाठी रात्री अपरात्री फारसा न जागाणाऱ्या या देशाला नीरजने झोपेला आवर घालण्यास भाग पाडले. भारतीय वेळेनुसार ११.४५ वाजता नीरजच्या भालाफेकीच्या फायनलला सुरूवात झाली. चौथ्या क्रमांकावरून सुरुवात करणाऱ्या नीरजचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला अन् सर्व टेंशनमध्ये आले. पण, नीरजवर असलेला विश्वास त्यांना सुवर्ण स्वप्न दाखवत होता. त्याने दुसऱ्याच प्रयत्नात ८८.१७ मीटर लांब भाला फेकला अन् थेट अव्वल स्थानी पोहोचला.. पाकिस्तानचा अर्शद नदीमने त्याच्या तिसऱ्या प्रयत्नात ८७.८२ मीटर अंतर पार करून भारताच्या गोल्डन बॉयला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. नीरजचे भालाफेकीचे अंतर पुढील तीन प्रयत्नात कमी कमी होतं गेलं, परंतु त्याला पहिल्या स्थानावरून कोणीच हटवू शकले नाही.
पाकिस्तानच्या अर्शदसह झेक प्रजासत्ताकचा याकुब व्हॅडलेच्ज आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर हे टक्कर देण्यासाठी सज्ज होतेच. पण, नीरजचे आसपास कुणी आज फिरकूच शकले नाही. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा नीरज चोप्रा ( Neeraj Chopra) हा अंजु बॉबी जॉर्ज ( कांस्यपदक- लांब उडी, २००३) यांच्यानंतर पहिला भारतीय ठरला होता. पण, आज त्याने गोल्डन कामगिरी करून जग जिंकले. २०२०मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण आणि आज जागतिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून नीरज दिग्गज नेमबाज अभिमन बिंद्रा याच्या खास विक्रमाच्या पंक्तित जाऊन बसला. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आणि वर्ल्ड चॅम्पियन बनणारा बिंद्रा हा भारताचा एकमेव खेळाडू होता.
नीरजने यापूर्वी २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. २०१६ मध्ये नीरज हे नाव जगभरात प्रथम पोहोचले. त्याने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धा ८६.४८ मीटर लांब भालाफेकून जिंकली आणि ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. त्याशिवाय डायमंड लीग ( २०२२), आशियाई स्पर्धा ( २०१८), राष्ट्रकुल स्पर्धा ( २०१८), आशियाई अजिंक्यपद ( २०१७), दक्षिण आशियाई ( २०१६) स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण कमाई केली आहे.
ऐतिहासिक सुवर्ण भालाफेक