ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर झालेल्या भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड सराव एकदिवसीय सामन्यात धोनी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना होता. भारत अ संघाचा तीन विकेटने पराभव जरी झाला असला तरी सामन्यात धोनी-धोनी नावाचा जयघोष होता. धोनीने या सामन्यात धुंवाधार फलंदाजी करताना 40 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांचे योगदान दिले.
सामन्यानंतर धोनी-युवराज यांच्यात असलेल्या दोस्तीची झलक पाहायला मिळाली. युवराजने सोशल मिडीयावर व्हीडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये युवराज धोनीची मुलाखत घेत असल्याचे दिसत आहे. युवराजच्या प्रश्नावर धोनी म्हणाला, माझी आक्रमक फलंदाजी सुरूच राहील, कर्णधारपद सोडल्यानंतर मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करु शकेन. आतापर्यंत तुझं क्रिकेट करिअर कसं राहिलं या प्रश्नावर बोलताना, धोनी युवराजकडे पाहात म्हणाला, तुमच्या सारखे चागंले खेळाडू संघात होते. 10 वर्ष कर्णधारपदाचा मी पुर्णपणे आनंद घेतला आहे. यानंतरचं माझं करिअर असंच राहिल अशी अपेक्षा आहे. 2007 मध्ये युवराजने एका षटकात लगावलेल्या सहा षटकारांचा उल्लेख करण्यासही तो विसरला नाही.