ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - आजपासून 9 वर्षापूर्वी 19 सप्टेंबर 2007 रोजी युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात सहा सिक्स मारून इतिहास रचला होता. दक्षिण अफ्रिकेमध्ये भरलेल्या पहिल्या वर्ल्ड टी-20मध्ये ब्रॉडची पिसं काढताना युवीने तमाम भारतीयांची मने जिंकली होती.
विरेंद्र सेहवाग (68) व गौतम गंभीर (58) या दोघांनी भारताला दमदार सुरूवात करून दिली होती, परंतु युवीने त्या एका षटकात सामन्याचा नूर पार पालटला. अँड्र्यू फ्लिंटॉफबरोबर आधीच्या षटकामध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती, ज्याचा सगळा राग ब्रॉडवर काढला गेला. क्रिकेटच्या इतिहासात याआधी तीन वेळा एका षटकात सहा षटकार मारण्याचा विक्रम झाला आहे, परंतु टी-20 मधला हा पहिलाच.
मिडविकेट, स्क्वेअर, कव्हर, बॅकवर्ड पॉइंट, पुन्हा मिडविकेट अशी चौफेर फटकेबाजी करत युवीने क्रिकेटप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले होते. युवीने या सामन्यात टी-20 मधली सगळ्यात जलदगती अर्धशतक झळकावले अवघ्या 12 चेंडूंमध्ये.
हा सामना इंग्लंडने 18 धावांनी गमावला. विशेष म्हणजे, 18 वं षटक संपलं तेव्हा भारत व इंग्लंड दोघांच्या धावा जवळपास समान म्हणजे 170 च्या आसपास होत्या. परंतु, 19व्या षटकामध्ये युवीने फटकावलेल्या 36 धावांची बरोबरी इंग्लंडला करता आली नाही आणि भारताने 18 धावांच्या फरकानं सामना जिंकला.
या सहा षटकारांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात ज्या तिघांनी यापूर्वी हा पराक्रम केला आहे, त्यातील एक रवी शास्त्री, युवराज हा पराक्रम करत असताना समालोचन करत होता.