नवी दिल्ली : सीनिअर फलंदाज दिनेश कार्तिकच्या शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर तमिळनाडूने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगालवर ३७ धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूने बंगालवर अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. याआधी तमिळनाडूने २00८-0९ आणि २00९-१0 मध्येदेखील बंगालवर मात केली होती.तमिळनाडूने ४७.२ षटकांत २१७ धावा केल्या. यात कार्तिकच्या सुरेख ११२ खेळींचा समावेश होता. दिनेश कार्तिकने त्याच्या शतकी खेळीत १४ चौकार मारले. बंगालकडून मोहम्मद शमीने २६ धावांत ४, तर अशोक दिंडाने ३६ धावांत ३ गडी बाद केले. त्यानंतर तमिळनाडूने बंगाल संघाला १८0 धावांत गुंडाळले. आॅफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर याला बळी मिळाला नाही; परंतु त्याने खूपच किफायती गोलंदाजी करताना फक्त १७ धावा दिल्या. श्रीवत्स गोस्वामी (२३) आणि अभिमन्यू ईश्वरन (१) स्वस्तात बाद झाले. कर्णधार मनोज तिवारी फक्त ३२ धावाच करू शकला. त्याला विजय शंकरने त्रिफळाबाद केले. सुदीप चॅटर्जी (५८) आणि अनुस्तुप मजुमदार (२४) यांनी पाचव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला; परंतु ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही.संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू : ४७.२ षटकांत सर्वबाद २१७. (दिनेश कार्तिक ११२, बाबा इंद्रजित ३२, वॉशिंग्टन सुंदर २२. मोहंमद शमी ४/२६, अशोक दिंडा ३/३६). बंगाल : ४५.५ षटकांत सर्वबाद १८0. (सुदीप चॅटर्जी ५८, मनोज तिवारी ३२, अनुस्तुप मजुमदार २४, ए. गनी २४. अश्विन क्रिस्ट २/२३, एम. मोहंमद २/३0, राहिल शहा २/३८).
तमिळनाडूने जिंकला विजय हजारे करंडक
By admin | Published: March 21, 2017 1:02 AM