रांची : पुण्याच्या गवताळ खेळपट्टीवर उणिवा चव्हाट्यावर आणल्यामुळे ‘अंडर डॉग’ मानल्या जाणाऱ्या युवा श्रीलंका संघाने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय नोंदविला. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) महेंद्रसिंह धोनीपुढे घरच्या मैदानावर ‘करा किंवा मरा’ अशा दुसऱ्या लढतीत पाहुण्यांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे अवघड आव्हान उभे ठाकले आहे.संघबांधणी प्रक्रियेतून वाटचाल करणाऱ्या युवा लंका संघात अनुभवी खेळाडू नाहीत, तरीही पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंना त्यांनी पाणी पाजले. टीम इंडियाने महत्प्रयासाने शंभरी गाठली. नंतर सामनाही गमाविला. विश्वचषकाच्या तयारीत असलेल्या भारतीय संघाचा हा पराभव डोळे उघडणारा ठरावा. शिवाय चुका सुधारण्याची ही संधी असावी, असे मानायला हरकत नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे पडलेल्या धोनी अॅन्ड कंपनीला दुसरा सामना जिंकून बरोबरी साधण्याची संधी असेल. रांचीच्या खेळपट्टीवर गवत नाही. ही खेळपट्टी मंद समजली जात असल्याने भारताला लाभ होऊ शकतो. हा सामना आधी दिल्लीत होणार होता. आता रांचीत होत असल्याने धोनीला घरच्या मैदानावर खेळण्याची संधी चालून आली आहे. येथे तो मोठी खेळी करेल, अशी आशा आहे. पुण्याच्या खेळपट्टीने दगा दिल्याचे त्याने सामन्यानंतर सांगितले होते, पण भारतीय फलंदाजांचे अपयश हेच पराभवाचे मुख्य कारण होते हे स्पष्ट झाले. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन हे दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. सर्वोत्कृष्ट फिनिशर असलेला धोनी दोन धावा काढून परतला. हार्दिक पंड्या आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा हेदेखील अपवाद नव्हते. पराभवामुळे मधल्या आणि तळाच्या फळीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. मोठ्या स्पर्धेत खेळताना प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका चोखपणे बजावावीच लागेल हा धडा पराभवातून मिळाला. युवराज, रैना, हरभजन, नेगी आणि आश्विन यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. भारताने दुसरा सामना गमविला तर मालिकाही गमावेल. आणि असे घडू नये यासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सुधारणा घडवून आणावीच लागणार आहे. लंकेचा युवा कर्णधार दिनेश चंडीमल हा संघासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याने विजयात सर्वाधिक ३५ धावांचे योगदान दिले. पदार्पणातच टिच्चून मारा करणारे कसून रजीता, दसनू शनाका, दुष्यंत चमिरा हे पुन्हा कहर करू शकतात. फलंदाजीची हवा काढणाऱ्या रजीतापासून अधिक सावध राहावे लागेल. एकूणच लंकेच्या युवा खेळाडूंना गंभीरपणे घेण्याचे आवघड आव्हान भारतापुढे राहील. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, युवराजसिंग, रवींंद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमरा, पवन नेगी, आशिष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि हरभजनसिंग. श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), दुष्मंता चामीरा, निरोशन डिकवेला, तिलकरत्ने दिलशान, बिनुरा फर्नांडो, दिलहारा फर्नांडो, असेला गुणरत्ने, धनुष्का गुणतिलका, चमारा कापुगेदारा, तिसारा परेरा, सीकुगे प्रसन्ना, कासून रजिता, सचित्रा सेनानायके, दासून सनाका, मिलिंदा सिरिवर्धना, जाफरी वेंडरसे.
विजयाची कास धरा रे...
By admin | Published: February 12, 2016 12:55 AM