हरारे : अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून पहिल्याच दौऱ्यात यशस्वी कामगिरी केली. झिम्बाब्वेला एकदिवसीय मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप देऊन रहाणेने यशस्वीपणे कर्णधार म्हणून कामगिरी केली असली, तरी त्याने या कामगिरीचे श्रेय संपूर्ण संघाला दिले आहे.आयसीसी सांघिक मानांकन सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या मालिकेमध्ये संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रहाणेने मंगळवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर सांगितले, ‘‘या यशाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. सर्व खेळाडू एकजूट होऊन खेळल्याने संघाची यशस्वी कामगिरी झाली.’’ अखेरच्या सामन्यात केदार जाधवने शतक, तर पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या मनीष पांड्ये यांचे कौतुक करताना रहाणे म्हणाला, की पांड्ये आणि केदार यांच्यातील भागीदारी महत्त्वपूर्ण होती. दोघांमध्ये जिंकण्याची भूक असल्याने आम्ही मालिका विजय मिळवला. अंबाती रायडूने पहिल्या सामन्यात शतक केले, मुरली विजयने दुसऱ्या सामन्यात आणि केदारने तिसऱ्या सामन्यात. तसेच आम्ही चांगली गोलंदाजीदेखील केली. एकूणच संघाने एकत्रितपणे यशस्वी कामगिरी केली, असेही रहाणे म्हणाला.रायडूला झालेल्या दुखापतीबाबत रहाणेने सांगितले, की रायडू दुखापतीतून सावरत असून, तो लवकरच संघात पुनरागमन करेल. तो संघाचा महत्त्वाचा खेळाडू असून, त्याने मालिकेत संघासाठी मोलाचे योगदान दिले. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या केदार जाधवने सांगितले, की या शतकाचा आनंद असून, मी माझ्या कुटुंबीयांचे खूप आभार मानतो. कर्णधार आणि सपोटर्् स्टाफ यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही खेळी शक्य झाली. पांड्येने मला काही वेळ स्थिरावण्यास वेळ दिल्याने मला माझी खेळी खेळता आली, असेही केदारने सांगितले.
हा विजय सांघिक : अजिंक्य रहाणे
By admin | Published: July 16, 2015 2:22 AM