मुंबई, दि. 4 - भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचं वातावरण असून कोणत्याही क्षणी युद्द जाहीर होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भारत सामजंस्यपणे तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असताना, चीन मात्र भारताला वारंवार युद्धाची धमकी देत आहे. भारताने मात्र मैदानाबाहेर उभं राहून पोकळ गप्पा मारण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. दरम्यान भारताने चीनविरोधात मैदानात उतरण्याची तयारी केली असून युद्धाचा हा सराव सामना बॉक्सिंगच्या मैदानात पार पडणार आहे. भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंह या युद्धात भारताचं नेतृत्व करणार असून चीनला जमिनीवर लोळवण्याची पुर्ण तयारी त्याने केली आहे. चीनकडून जुल्फिकार मैमतअली मैदानात उतरणार आहे. शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी दुहेरी खिताब सामना पार पडणार आहे. मुंबईतील वरळी येथील एनएससीआय इनडोर स्टेडियममध्ये हा रोमांचक सामना होणार आहे.
भारत आणि चीन एकमेकांना सतत आव्हान देत असताना बॉक्सिंगच्या मैदानात कोण सुलतान ठरतो याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यावेळी दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे विजेंदर सिंह जवळपास आठ महिन्यानंर बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. गेल्या आठ सामन्यांमध्ये सात वेळा नॉक-आऊट पंच खेळणारा विजेंदर यावेळीही आपला विजयी ठोसा लगावेल अशी भारतीयांना आशा आहे. तर चीनी बॉक्सर जुल्फिकार मैमतअलीदेखील आतापर्यंत पराभूत झालेला नाही.
विजेंदर सिंगने हा सामना आपण सहजपणे जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. सध्या भारत - चीनमध्ये तणाव सुरु असताना होणारा या सामन्याची कल्पना आपल्याला असून खांद्यावर असणारी जबाबदारी समजू शकतो असं विजेंदरने सांगितलं आहे. आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडू जुल्फिकार मैमतअलीसंबंधी प्रश्न विचारला असता त्याने सांगितलं की, 'मी अनुभवी आहे, पण मी त्याला एक अनुभवी खेळाडू मानत नाही. जुल्फिकार तरुण आणि मजबूत खेळाडू असून मी त्याच्यासाठी तयार आहे. या सामन्यासाठी रणनीती आखली असून प्रशिक्षकासोबत यासंबंधी चर्चा केली आहे. मला शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे'.
विजेंदर सध्या डब्ल्यूबीओ (वर्ल्ड बॉक्सिंग ऑर्गनायजेशन) आशिया पॅसिफिक मिडलवेट चॅम्पिअन आहे. तर जुल्फिकार मैमतअली हा डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पिअन आहे. या लढतीमध्ये दोन्ही बॉक्सर आपआपले डब्ल्यूबीओ विजेतेपद पणाला लावतील. ही लढत जिंकणार बॉक्सर आपल्यासह प्रतिस्पर्धी बॉक्सरचाही किताब पटकावेल. आपल्यासाठी हा इतका काही मोठा सामना नसल्याचं विजेंदर बोलला आहे. जुल्फिकार चीनी माल असून चीनी माल जास्त टिकत नाही असा टोलाही विजेंदरने लगावला आहे.
पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'जुल्फिकार तरुण असल्याने चुका करण्याची शक्यता आहे. तो घाईत दिसत आहे. पहिल्या राऊंडमध्येच तो सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न करेल, पण तेव्हा मला शांत राहावं लागेल'.
विजेंदरने सांगितलं की, 'अजून खूप सामने मला खेळायचे आहेत. हे एक मोठं आव्हान आहे असं मला नाही वाटत. जर त्याने आक्रमक खेळी केली तर मीदेखील त्याला त्याच पद्धतीने उत्तर देईन'.
भारत आणि चीनमध्ये सिक्कीम सेक्टरमध्ये सुरु असलेल्या वादावरही विजेंदरने भाष्य केलं. त्याने सांगितलं की, 'भारत आणि चीनमध्ये हा सामना असल्याने मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव आहे. सध्या परिस्थिती योग्य नसल्याने जबाबदारी आणखीन वाढली आहे'.
दुसरीकडे चीनी बॉक्सर जुल्फिकारने आपली पुर्ण तयारी झाली असल्याचा दावा केला आहे. 'मी पुर्ण तयार आहे. चीनमध्ये बॉक्सर्स व्यवसायिक बॉक्सिंगकड वळू लागले आहेत. पुढील तीन वर्षात आम्ही वर्ल्ड चॅम्पिअन बनू', असा विश्वास जुल्फिकारने व्यक्त केला आहे. यासोबतच विजेंदरसोबत होणा-या सामन्याचा आपल्याला फायदाच होईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली. 'विजेंदरसारख्या चांगल्या बॉक्सर्ससोबत खेळल्यानंतरच मला माझी खरी क्षमता कळेल. त्यामुळेच मी विजेंदरची निवड केली', असं जुल्फिकारने सांगितलं.
भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या वादावर मात्र बोलण्यास त्याने नकार दिला. हा सामना फक्त माझ्यात आणि विजेंदरमध्ये असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. विजेंदरच्या चीनी माल टिपणीवर बोलताना मैमतअली म्हणाला, ‘चिनी लोक काय करू शकतात, हे दाखविण्यास मी उत्सुक आहे. चीन काय करू शकतो, हे आम्ही भारताला वारंवार दाखविले आहे. विजेंदरलाही धडा शिकविण्याची वेळ आली आहे.’
या महत्त्वाच्या बाउटसाठी विजेंदर आपला ट्रेनर ली बीयर्ड याच्यासह इंग्लंड येथील मँचेस्टर येथे सराव करीत आहे. विशेष म्हणजे, या लढतीचे पहिले तिकिट विजेंदरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला प्रदान केले. दरम्यान यावेळी, अखिल कुमार, जितेंदर कुमार आणि नीरज गोयत हे अन्य भारतीय स्टार बॉक्सरही आपआपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धीविरुद्ध लढतील. तसेच, प्रदीप खारेरा, धर्मेंद्र ग्रेवाल आणि कुलदीप धांडा हे देखील यावेळी आपले कौशल्य दाखवतील.