जयपूर: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये काल(दि.24) झालेल्या लढतीत भारताचा व्यावसायिक मुष्टियुद्धपटू विजेंदर सिंग याने सलग दहावा विजय मिळवण्याचा विक्रम केला. आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत आफ्रिकी चॅम्पियन घानाचा बॉक्सर अर्नेस्ट अमुजूचा पराभव करून डब्ल्यूओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा किताब आपल्याकडेच राखला.
सामन्यापूर्वी काही दिवसांपासून दोन्ही खेळाडूंकडून एकमेकांबाबत विधानं केली जात होती. अर्नेस्टविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीसाठी मी सज्ज असून त्याने मला दोन मिनिटामध्ये लोळवण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे कळाले. मला वाटते त्याचे हे आव्हान बालिशपणाचे असून खरा मुकाबला रिंगमध्येच रंगेल. त्याचेवेळी त्याला कळेल की सिंग इज किंग,’ अशा शब्दांत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने अमुजू याला इशारा दिला होता. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.
अखेरच्या दहाव्या फेरीपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर विजेंदर विजयी ठरला. त्याचा प्रतिस्पर्धी अर्नेस्ट अमुजूने विजेंदरला कडवी टक्कर दिली. यापूर्वी झालेल्या 25 पैकी 23 सामन्यात अर्नेस्टने विजय मिळवला होता आणि केवळ 2 सामने त्याने गमावले होते. अखेर कालच्या 26 व्या सामन्यातही त्याच्या पदरी निराशा पडली तर दुसरीकडे विजेंदरने आपला सलग दहावा विजय नोंदवला.
या विजयीमुळे मी नक्कीच आनंदी आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू अनुभवी असल्यामुळे ही लढत दहाव्या फेरीपर्यंत गेली. मला जेतेपदानेच या वर्षाचा शेवट करायचा होता. अशी प्रतिक्रिया विजेंदरने सामना संपल्यानंतर दिली.
आतापर्यंत अपराजित असलेल्या विजेंदरने सलग 10 लढती जिंकताना व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आपला हिसका दाखवला आहे. (Image Credit: Getty Image)