नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी बॉक्सर केरी होप याचे कोणतेही दडपण न घेता भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंग याने १० राउंडच्या लढतीत झुंजार बाजी मारत डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियनशीपवर कब्जा केला. विशेष म्हणजे हे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय बॉक्सर म्हणून विजेंदरने यावेळी इतिहास रचला.
या लढतीआधी ऑस्ट्रेलियाच्या होपने मी अनुभवाच्या जोरावर विजेंदरला सहज नमवेल, असे सांगितले होते. मात्र विजेंदरने प्रत्यक्ष रिंगमध्ये आपला हिसका दाखवताना होपचा फुगा फोडला. शनिवारी रात्री झालेल्या या अत्यंत चुरशीच्या व थरारक लढतीत पंचांच्या एकमताने विजेंदरला विजयी घोषित करण्यात आले.
दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये सुमारे १० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत विजेंदरने तिन्ही पंचांच्या निर्णयानुसार ९८-९२, ९८-९२ १००-९० अशी गुणांच्या आधारे बाजी मारली. दखल घेण्याची बाब म्हणजे विजेंदरने आपली सलग सातवी व्यावसायिक लढत जिंकली. तसेच नॉकआऊट किंग म्हणून फेमस असलेल्या विजेंदरने पहिल्यांदाच गुणांच्या आधारे लढत जिंकली आहे.
दुसरीकडे, तुलनेत अनुभवी असलेल्या होपने आपल्या कारकिर्दीत ३१ लढतींपैकी आठवी लढत गमावली आहे. मात्र असे असले तरी, होपने विजेंदरला चांगलेच झुंजवले. १० राउंडपर्यंत खेचल्या गेलेल्या या लढतीआधी विजेंदरने आपल्या सर्व सहा लढतींचा निकाल तीन राउंडमध्येच लावला होता. (वृत्तसंस्था)
असा रंगला थरार...
पहिला राउंड : दोघांचाही बचावात्मक पवित्रा.
दुसरा राउंड : दोन्ही खेळाडूंनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. ५८व्या सेकंदाला विजेंदर पडला.
तिसरा राउंड : होपने विजेंदरवर जोरदार हल्ला केला. विजेंदरच्या चेहºयावर ठोसे मारण्याचा होपचा प्रयत्न. त्यात यश मिळताना होपने विजेंदरच्या चेहºयावर जबरदस्त पंच मारला. विजेंदर अडखळताना दिसला.
चौथा राउंड : विजेंदरचा अप्रतिम पुनरागमनाचा प्रयत्न. यावेळी त्याने आक्रमक भूमिका घेतली. मात्र जोरदार ठोसे लगावण्याच्या दोन संधी गमावल्या.
पाचवा राउंड : जबरदस्त बचाव करताना विजेंदरने होपला जोरदार पंच मारला. होपच्या डाव्या डोळ्यावर स्वेलिंग स्पष्टपणे दिसत होते. विजेंदरने वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली.
सहावा राउंड : विजेंदरने दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली. त्याच्यापुढे होप हतबल दिसला. सलग ठोश्यांचा हल्ला करताना विजेंदरने होपला दबावाखाली ठेवले.
सातवा राउंड : होपची आक्रमक सुरुवात. काही चांगले पंच मारले. मात्र अंतिम क्षणाला विजेंदरने आपला हिसका दाखवताना आक्रमक पंच मारले. यावेळी दोघेही एकमेकांनी तोडीस तोड खेळ केला.
आठवा राउंड : विजेंदरचा शानदार खेळ. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. होपने स्वत:ला सावरत विजेंदरला झुंजवले. परंतु, विजेंदरने निर्णयाक सलग दोन पंच मारत वर्चस्व निर्माण केले.
नववा राउंड : दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. विजेंदरने सातत्याने होपला कॉर्नरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला.
अंतिम राउंड : दोन्ही खेळाडूंचा चांगलाच घामटा निघालेला. अशावेळी विजेंदरने एक पंच मारला. अंतिम क्षणी पुन्हा एक जोरदार ठोसा मारल्यानंतर विजेंदरने दबदबा राखून जेतेपदावर कब्जा केला.
------------------------
- विजेंदरने आपल्या कारकिर्दीतील पहिली फाइट मिळवली.
- हे विजेतेपद पटकावणारा विजेंदर पहिलाच भारतीय ठरला.
- पहिल्यांदाच विजेंदरला तीनहून अधिक राउंडमध्ये खेळावे लागले.
- विजेंदरने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच १० राउंडची लढत खेळली.
- या लढतीआधी अनेक अंडरकार्ड लढती झाल्या. मात्र सर्वाना उत्सुकता विजेंदरची होती.
- दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धून वाजवल्यानंतर लढतीला सुरुवात झाली.