ऑनलाइन लोकमत
बाकू, दि. 23- आशियाई चॅम्पियन विकास कृष्णन (७५ किलो) आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६४ किलो) यांनी गुरुवारी एआयबीए विश्व पात्रता बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना रिओ आॅलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले. मनोजने ताजिकिस्तानच्या राखिमोव्ह शवकात्जोनचा उपांत्यपूर्व फेरीत ३-० ने तर विकासने कोरियाच्या ली डोंगयुनचा याच फरकाने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. मनोजला शुक्रवारी उपांत्य फेरीच्या लढतीत ब्रिटनचा युरोपियन चॅम्पियन पॅट मॅकोरमॅकच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मॅकोरमॅकने उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या एमजीले हसनचा पराभव केला. विकासला उपांत्य फेरीत तुर्कमेनिस्तानच्या अचिलोव्ह अर्सलानबेकच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. अर्सलानबेकने उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या कावलॅरो सालवातोरचा पराभव केला. विकास व मनोज यांनी पात्रता मिळवल्यामुळे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय बॉक्सर्सची संख्या ३ झाली आहे. शिव थापाने (५६ किलो) मार्च महिन्यात आशियाई पात्रता स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले. मनोज म्हणाला, भारतीय बॉक्सिंगची परिस्थिती बघता रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवल्यामुळे समाधान वाटत आहे. संघावर दडपण होते, पण माझी कामगिरी चांगली झाल्यामुळे आनंद झाला. मी प्रशिक्षक, क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय कोचिंग स्टाफ, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि माझे वैयक्तिक प्रशिक्षक व वडील बंधू राजेश यांचे आभार मानतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे मला आॅलिम्पिक पात्रता मिळवता आली.राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्श सिंग संधू म्हणाले,ह्यमनोजने सर्व तिन्ही फेऱ्यांमध्ये वर्चस्व गाजवले. त्याने बुद्धीचा वापर करीत आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. विकासची कामगिरी शानदार होती. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला सहज पराभूत केले.ह्णविकासच्या उपांत्य फेरीतील सहभागाबाबत साशंकता आहे. कारण त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. मनोज व विकास यापूर्वी २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्येही सहभागी झाले होते. त्यावेळी मनोज उपांत्यपूर्व फेरीत तर विकास पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता.