नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता विकास कृष्ण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेती साविती बुरा दुसऱ्या स्थानी आहे. एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये वर्षांतील सर्वोत्तम बॉक्सर ठरलेल्या विकासने ७५ किलो वजनी गटात १३५० मानांकन गुणांची कमाई केली आहे. विकासने रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.पुरुष बॉक्सिंगमध्ये शिवा थापा ५६ किलो गटात सातव्या स्थानी आहे. माजी आशियाई चॅम्पियन व विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता शिवाने अलीकडेच लाइटवेट ६० किलो वजनी गटात सहभागी होण्यास प्रारंभ केला आहे. भारताचा एल देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट (४९ किलो) गटात २७ व्या स्थानी आहे, पण शिवाप्रमाणे तोसुद्धा आता ५२ किलो वजन गटात सहभागी होत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार लाईट वेल्टरवेट (६४ किलो) गटात ३६व्या स्थानी आहे. आता तो वेल्टरवेट (६९ किलो) गटात सहभागी होणार आहे. महिला बॉक्सरमध्ये साविती (८१ किलो) १५०० मानांकन गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. सरजूबाला देवी लाईट फ्लायवेट गटात (४८ किलो) तिसऱ्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
विकास चौथ्या, शिवा सातव्या स्थानी
By admin | Published: December 24, 2016 1:04 AM