बीजिंग : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेता भारताच्या विकास गौडाने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करताना थाळीफेक प्रकाराचीे अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक स्पर्धेतील भारताच्या पदकाचे आशास्थान असलेला विकास स्पर्धेच्या ‘अ’ गटातून आगेकूच करताना शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत सातव्या क्रमांकावरून आपले कौशल्य दाखवेल. विकासने पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात ६३.८६ मीटर अंतराची फेक करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात त्याची कामगिरी काहीशी खालावली. या वेळी त्याची फेक ६३.८४ मीटर इतकी होती. तर तिसऱ्या प्रयत्नात त्याची फेक अयशस्वी ठरली. दरम्यान, अमेरिकेत प्रशिक्षण घेत असलेला विकास आपल्या गटात चौथ्या स्थानावर राहिला. जमैकाच्या फेड्रिक डेसर्स याने सर्वाधिक ६५.७७ मीटर अंतराची फेक करून पहिल्या स्थानासह दिमाखात अंतिम फेरी गाठली. तर पोलंडच्या पियोत्र मलाचोवस्की याने ६५.५९ मीटरची फेक करून द्वितीय स्थान पटकावले असून, सायप्रसच्या एपोस्तोलोस पॅरेल्लीस याने ६४.४१ मीटरची फेक करून तृतीय स्थान मिळवले.पात्रता फेरीतील एकूण कामगिरी पाहिल्यास विकासहून केवळ सहा अॅथलिटची कामगिरी चांगली झाली. गतस्पर्धेत देखील सहभागी झालेल्या १५ सदस्यांच्या भारतीय चमूमधून केवळ विकासने अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले होते. त्या वेळी त्याने स्पर्धेत ७वे स्थान पटकावले होते. जागतिक थाळीफेकचा विक्रम ७०.१७ मीटरचा असून, या वर्षातील सर्वश्रेष्ठ कामगिरी ६८.२९ अशी आहे. विकासने आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ६६.२८ मीटरची सर्वोत्तम फेक केली असून, यंदाच्या वर्षी त्याची सर्वोत्तम फेक ६५.७५ मीटरची झाली आहे.
विकास गौडा अंतिम फेरीत
By admin | Published: August 28, 2015 1:15 AM