नवी दिल्ली : थाळीफेकीतील सध्याचा आशियाई चॅम्पियन विकास गौडा याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. फिट असेल तरच तो रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकेल, अशी माहिती भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने मंगळवारी माहिती दिली. एएफआय अध्यक्ष आदिल सुमारीवाला म्हणाले, ‘विकासच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. तो आॅलिम्पिक सुरू होण्याआधी फिट होईल, अशी आशा आहे. पुरुष गोळाफेक १२ आॅगस्ट रोजी होईल. ३३ वर्षांचा विकास अमेरिकेत वास्तव्यास आहे. गेल्या ७ डिसेंबर रोजी रिओसाठी पात्रता सिद्ध केल्यापासून विकास कुठल्याही स्पर्धेत सहभागी झाला नाही. मी गौडाच्या वडिलांशी बोललो. त्यांनी विकासच्या खांद्याला किरकोळ जखम झाल्याचे सांगितले. अमेरिकेत डॉक्टर पाठवून त्याच्या खांद्याचा तपास करण्यास आम्ही असमर्थ आहोत. वडिलांनी जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवावा लागेल. ही जखम किरकोळ असून आॅलिम्पिकपर्यंत विकास फिट होईल, असा विश्वासदेखील त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. विकासची चाचणी घेण्यात येणार नसली, तरी आम्ही त्याला फिटनेसकडे लक्ष देण्यास सांगू. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास तो फिट आहे की नाही, हे यातून निष्पन्न होईल. गौडाला थाळीफेक करावी लागणार आहे.’ आॅलिम्पिकसाठी ज्या ३८ खेळाडूंची यादी जाहीर झाली, त्यातील जे खेळाडू कमी-अधिक प्रमाणात जखमी आहेत त्यांच्या नावापुढे कंसात फिटनेसवर अवलंबून असे लिहिले आहे. (वृत्तसंस्था)
विकास गौडा जखमी, फिट असेल तरच रिओला जाणार
By admin | Published: July 13, 2016 3:09 AM