- आशिष गजभियेखडसंगी (चंद्रपूर) - नुकत्याच पार पडलेल्या जबलपूर आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चिमूर येथील रहिवासी असलेला विक्रम भरतसिंग बंगरिया या धावपट्टूने दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आला आहे.भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला विक्रम भारतातील सर्वात मोठी क्रीडा प्रशिक्षण संस्था असलेल्या इंडियन आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा प्रशिक्षणार्थी आहे. मागील आठवड्यात जबलपूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत आर्मीच्या स्पोर्ट्स कोट्यातून या स्पर्धेत विक्रम सहभागी झाला होता.जबलपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या द मार्बल रॉक रन आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत २१ कि.मी. अंतर एक तास चार मिनिट ३८ सेकंदात पूर्ण करीत या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाला. तर पहिल्या स्थानांवर केनियाचा धावपट्टू आला असून अवघ्या काही पावलांच्या अंतराने विक्रम पहिल्या स्थानापासून दूर राहिला. त्याच्या या यशाने त्याच्या मूळ गावी आनंदाचे वातावरण असून विक्रमवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव सुरू आहे.
चिमूरचा विक्रम जबलपूर आंतरराष्ट्रीय मॅराथॉनमध्ये दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 4:42 AM