Vinesh Phogat, World Championship 2022:स्टार महिला कुस्तीपटूविनेश फोगटनेकुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला. विनेश ही जागतिक चॅम्पियनशिपच्या इतिहासात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. तसेच ओव्हरऑल कुस्तीपटूंमध्ये दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली. विनेशने बुधवारी कांस्यपदकावर कब्जा केला. ही जागतिक स्पर्धा सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे खेळवली जात आहे. यावेळी विनेशला सुवर्णपदकाची अपेक्षा होती, परंतु महिलांच्या फ्री-स्टाइल ५३ किलो वजनी गटात पात्रता फेरीत तिला मंगोलियाच्या खुल्लान बटखुयागकडून ०-७ असा पराभव पत्करावा लागला. पण आता तिने शानदार पुनरागमन करत ५३ किलो वजनी गटात स्वीडनची कुस्तीपटू एम्मा जोआना माल्मग्रेनचा ८-० असा पराभव केला आणि कांस्यपदकाची कमाई केली.
विनेशने याआधी त्याने २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकले होते. कझाकस्तानमधील नूर सुलतान येथे ही जागतिक स्पर्धा पार पडली. विनेश फोगटने अलीकडेच बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये चमकदार कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकले. नॉर्डिक पद्धतीच्या आधारे तिने ती स्पर्धा जिंकली. विनेशने वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेती कॅनडाची कुस्तीपटू समंथा ली स्टीवर्टविरुद्धचा पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर विनेशने तिच्या दुसऱ्या सामन्यात नायजेरियाच्या मर्सी बोलाफुनोलुवा अडेकुरोआचा तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या केश्नी मदुरावाल्गेचा पराभव केला होता.
ऑलिम्पिकमध्ये केली होती चाहत्यांची निराशा
२०१६च्या रिओ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे विनेश फोगटच्या पदक जिंकण्याच्या आशा मावळल्या होत्या. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती जागतिक क्रमवारीतील मानांकन असलेली कुस्तीपटू म्हणून तिच्या वजन गटात सहभागी होती तरीही सुपर-८ टप्प्यांतच ती बाहेर पडली होती. या दोन निराशाजनक कामगिरीनंतर तिला कुस्तीतून निवृत्त होण्याचा काहींनी सल्ला दिला होता. पण त्या टीकाकारांना तिने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेपासून सडेतोड उत्तर देण्यास सुरूवात केली आहे.