भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने मंगळवारी सलग ३ सामने जिंकून ऑलिम्पिकमधील महिला कुस्तीच्या ५२ किलो वजनी गटामध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र आज सकाळी अतिरिक्त वजन असल्याने तिला ऑलिम्पिकमधून बाद ठरवण्यात आले. या निर्णयामुळे कोट्यवधी देशवासीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र विनेश फोगाटने देशाला पदक मिळवून देण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार विनेशने १२ तासांमध्ये तब्बल २.६ किलो वजन घटवलं होतं. असं करणं बऱ्याचदा जीवघेणं ठरू शकतं.
विनेशचं वजन घटवण्यासाठी प्रख्यात डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांची मदत घेण्यात आली होती. मात्र त्याचा विशेष फायदा झाला नाही. याबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, मंगळवारी उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर विनेशचं वजन अचानक ५२.७ किलो एवढं झालं होतं. आमच्याकडे वेळ खूप कमी होता. खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र केवळ २.६ किलो वजन कमी झालं. अखेर आम्ही तिचा जीव धोक्यात घालू शकत नाही, असं डॉक्टरांना सांगावं लागलं. दरम्यान, विनेश फोगाट सध्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या रिपोर्टनुसार उपांत्य लढतीनंतर विनेश रात्रभर झोपली नाही. तिने आपलं वजन ५० किलोपर्यंत आणण्यासाठी रात्रभर व्यायाम केला. या काळात तिनं काहीही खाल्लं नाही. तसेच तिनं पाणीसु्द्धा प्राशन केलं नाही. त्याबरोबरच तिनं रात्रभर सायकलिंग, जॉगिंग आणि स्किपिंग केलं. एवढंच नाही, तर वजन कमी करण्यासाठी पोट साफ करण्याची पद्धतही आजमावण्यात आली. याशिवाय केस कापणे आणि शरीरातील रक्त काढण्यासारखे उपाय करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.