भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने महिलांच्या कुस्तीमध्ये ५० किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठत इतिहास रचला होता. तसेच देशासाठी बहुमूल्य असं एक ऑलिम्पिक पदक निश्चित केलं होतं. मात्र आज वजनी गटाच्या मर्यादेपेक्षा किंचीत अधिक वजन आढळल्याने विनेशला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आलं आहे. या निर्णयामुळे विनेशचं हातातोंडाशी आलेलं पदक हुकलं असून, त्याचा मोठा धक्का विनेशला बसला आहे. दरम्यान, बेशुद्ध झाल्याने विनेश फोगाट हिला पॅरिसमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळत असलेल्या माहितीनुसार उपांत्य लढतीनंतर वजन किंचीत वाढलं असल्याचं लक्षात आल्यानंतर विनेश हिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत बसली. मात्र आज सकाळी वजन करण्यात आलं. तेव्हा तिचं वजन हे निश्चित मर्यादेपेक्षा किंचित अधिक भरलं. त्यामुळे समितीने तिला स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय सुनावला. या निर्णयाचा मोठा धक्का विनेशला बसल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. सलामीच्या सामन्यात विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करतावना जपानची दिग्गज खेळाडू सुसाकी विरूद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर विनेशने उपांत्यपूर्व सामन्यात सामन्यात युक्रेनची प्रतिस्पर्धी ओक्साना लिवाच हिचा पराभव केला. तर उपांत्य सामन्यात विनेशने क्यूबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमैनला ५-० नं दारुण पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच तिला अपात्र ठरवण्यात आलं.