vinesh phogat latest news : ऑलिम्पिकच्या फायनलला मुकलेल्या विनेश फोगाटचे आज भारतात आगमन झाले. मोठ्या उत्साहात ती तिच्या मूळ गावी पोहोचली. भारताची गोल्डन गर्ल म्हणून तमाम भारतीयांच्या मनात जागा मिळवणारी विनेश फोगाट शनिवारी मायदेशात परतली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये अंतिम फेरी गाठूनही विनेश पदकाला मुकली. १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारताच्या हक्काचे पदक गेले. अखेर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले पण तिथेही विनेशच्या हाती निराशा पडली. भारतात परतताच विनेशला अश्रू अनावर झाले. तिच्या सहकारी खेळाडूंनी दिल्ली विमानतळावर तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिक फायनलपूर्वी अपात्र ठरविण्याविरुद्ध केलेले अपील बुधवारी फेटाळले अन् या निर्णयाने विनेशसह सर्व भारतीयांची मोठी निराशा झाली.
विनेश हरियाणातील तिच्या मूळ गावी बलाली येथे पोहोचताच सर्वांनी मने जिंकली. विनेश फोगाटने तिच्या गावी उपस्थितांशी बोलताना सांगितले की, त्यांनी मला सुवर्ण पदक दिले नाही म्हणून काय झाले. मला माझ्या माणसांनी गोल्ड देऊन माझा सत्कार केला. हे गोल्ड, हा सन्मान आणि हा आदर यापुढे हजार सुवर्ण पदके फिकी आहेत.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली.