पॅरिस : बुधवारची रात्र सर्व भारतीयांसाठी विशेष, नव्हे ऐतिहासिक ठरणार होती. आपली विनेश फोगाट देशाला कुस्तीत पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पटकावून देणार होती. विनेशचे हे ऐतिहासिक यश ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी सर्वांनी आपापल्या घडाळ्यामध्ये, मोबाइलमध्ये अलार्म लावून ठेवले होते. परंतु, सकाळी अशी बातमी मिळाली की, केवळ विनेशच नाही, तर सर्व भारतीयांचे मन हळहळले. अवघे १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने विनेश ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली, आणि...
विनेश, तू अवघ्या काही ग्रॅम वजनाने अपात्र ठरली म्हणून आम्ही कोट्यवधी जनता निराश झालो, तिथे तुझी काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाच नाही करवत. देशाची पहिली ऑलिम्पिक सुवर्ण विजेती मल्ल बनण्यापासून तू केवळ काही तास दूर होतीस. १९५२ साली खाशाबा जाधव यांनी कुस्तीत मिळवलेले कांस्य पदक हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक ठरलेले. तू तर कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक आणणार होतीस; पण, तू आम्हाला एका ऐतिहासिक यशाचा जल्लोष करण्याची ‘सुवर्ण’ संधी दिली होतीस. हे यश आता थोडक्यात हुकले असले, तरी तू देशाची ‘गोल्डन गर्ल’ म्हणूनच परतणार आहेस. सध्या हीच भावना सर्व भारतीयांची आहे.
अपात्र ठरल्याचे कळल्यानंतर विनेश बेशुद्ध पडली. तिच्यावर लगेच उपचार करण्यात आले. आता तिची प्रकृती स्थिर आहे.
काय आहे नियम?युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (यूडब्ल्यूडब्ल्यू) मान्यतेने होणाऱ्या विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये प्रत्येक मल्लाला आपल्या वजनी गटानुसार दोन किलो वजनाची सूट दिली जाते. परंतु, अशी सूट ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये दिली जात नाही.
नेमके काय झाले?विनेश गुरुवारी ५० किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या अंतिम सामन्यात खेळणार होती. या सामन्याच्या आधी करण्यात आलेल्या शारीरिक वजनामध्ये विनेशचे वजन १०० ग्रॅम अधिक भरले गेले. एका भारतीय प्रशिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी विनेशचे वजन १०० ग्रॅमने अधिक भरले आणि नियमानुसार हे अवैध आहे. त्यामुळे विनेशला अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरविण्यात आले.
विनेशने रात्रभर काय काय केलं? १२ तासांत २.६ किलो वजन घटवलंभारताच्या ऑलिम्पिक पथकाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनी सांगितले की, मंगळवारी उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर विनेशचे वजन अचानक ५२.७ किलो एवढे झाले होते. आमच्याकडे वेळ खूप कमी होता. खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र केवळ २.६ किलो वजन कमी झाले. अखेर आम्ही तिचा जीव धोक्यात घालू शकत नाही. - उपांत्य लढतीनंतर विनेश रात्रभर झोपली नाही. तिने आपलं वजन ५० किलोपर्यंत आणण्यासाठी रात्रभर व्यायाम केला. तिनं काहीही खाल्लं नाही. पाणीसु्द्धा प्राशन केलं नाही. - रात्रभर सायकलिंग, जॉगिंग केले आणि दोरीवरच्या उड्याही मारल्या. वजन कमी करण्यासाठी पोट साफ करण्याची पद्धतही आजमावण्यात आली. - केस कापले आणि शरीरातील रक्त काढण्यासारखे उपाय करण्यात आल्याचा दावाही केला जात आहे.
या प्रश्नांचे काय?- तीन सामने जिंकल्यानंतर अंतिम फेरीआधी अचानक दोन किलो वजन कसे वाढले?- विनेशचे वजन कमी करण्यासाठी तिच्या सपोर्ट स्टाफने काय केले?- वजन करण्याच्या निर्धारित वेळेआधी खेळाडू कितीही वेळा वजन तपासून घेऊ शकतात. तेव्हा ही बाब लक्षात आली नाही का?- उपांत्य सामन्यानंतर विनेशने काय खाल्ले किंवा प्यायले असेल का? घातपाताची शक्यता आहे का?- अतिरिक्त वजन भरले गेल्यानंतर ते वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला का?
तुला दमदार पुनरागमन करायचे आहेविनेश, तू चॅम्पियन्सची चॅम्पियन आहेस. तू भारताचा सन्मान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणास्त्रोत आहेस. आजच्या धक्क्याने खूप दु:ख झाले. काश, मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकलो असतो की यावेळेला मी किती निराश आहे; पण मला माहीत आहे की, तू पुनरागमन करशील. आव्हानांचा खंबीरपणे सामना करणे तुझ्या स्वभावात आहे. भक्कमपणे पुनरागमन कर. आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
विनेश फोगाट स्पर्धेबाहेर गेल्याचे कळवताना आम्हाला खूप दु:ख होत आहे. पूर्ण रात्र संघाने अथक मेहनत घेतल्यानंतरही विनेशचे वजन ५० किलोहून अधिक भरले गेले. सध्या याबाबत अधिक प्रतिक्रिया देता येणार नाही. भारतीय संघाकडून सर्वांना विनंती आहे की, विनेशच्या गोपनीयतेचा सन्मान करा. भारतीय संघ सध्या पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत आहे.- भारतीय ऑलिम्पिक संघटना
क्यूबाला सुवर्ण संधीभारताची विनेश अपात्र ठरल्यानंतर क्यूबाची मल्ल युसनेलिस गुजमन लोपेझ हिला अंतिम सामन्याची संधी मिळाली असून, ती आता सुवर्णपदकासाठी अमेरिकेच्या साराह ॲन हिल्डेब्रांट हिच्याविरुद्ध खेळेल. उपांत्य सामन्यात विनेशने लोपेझला नमवून आगेकूच केली होती.