कराची : आशिया कप टी-२० स्पर्धेत शनिवारी रात्री भारताविरुद्धचा पराभव पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही. भारताविरुद्धच्या पराभवानंतर शेजारी राष्ट्रामध्ये बघायला मिळणारी प्रतिक्रिया या वेळीही अनुभवाला मिळाली. पराभवामुळे संतप्त झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी टीव्ही संच फोडले, अनेकांनी खेळाडूंविरुद्ध नारेबाजी केली, तर काही चाहत्यांनी खेळाडूंचे पुतळे जाळले. पाकिस्तानातील सर्वांत मोठे शहर असलेल्या कराचीमध्ये विविधी ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर सामना बघण्यासाठी एकत्र आलेले चाहते पराभवामुळे निराश व नाराज झाले. वृत्तानुसार पंजाबमधील काही भागांत नाराज चाहत्यांनी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अन्य खेळाडूंचे पुतळे व पोस्टर जाळले. भारताविरुद्धचा पराभव मोठी बाब नाही. पाकिस्तान संघाला स्पर्धेत पुनरागमन करण्याची संधी आहे, असे वक्तव्य पाकिस्तानचा कर्णधार आफ्रिदीने केले होते. त्यामुळे चाहते अधिक नाराज झाले. (वृत्तसंस्था)
सबबी सांगण्यापेक्षा क्रिकेट खेळणे सुरू करा. तुम्ही आता लहान नाही. खेळत रहा, निवृत्ती स्वीकारू नका; पण चांगली कामगिरी करा.’ माजी कसोटी कर्णधार मोहम्मद युसूफ व वेगवान गोलंदाज सरफराज नवाज यांनी विश्व टी-२० नंतर निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याच्या आफ्रिदीच्या वक्तव्यावर टीका केली. - सिकंदर बख्त, माजी कसोटीपटू
> खेळपट्टीला अनुकूल खेळलो नाही : आफ्रिदीमीरपूर : भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने खेळपट्टीला अनुकूल खेळलो नसल्याची कबुली दिली. आफ्रिदी म्हणाला, ‘आम्हाला सुरुवातीला परिस्थितीचे आकलन करणे गरजेचे होते आणि खेळपट्टीचे स्वरूप बघायला पाहिजे होते. आम्हाला खेळपट्टीसोबत जुळवून घेता आले नाही. टी-२० क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये चार-पाच फलंदाज बाद झाले तर १४० धावांचा पल्ला गाठणे कठीण ठरते.’