Bhagwani Devi Dance Video: एखाद्याने काही करण्याची जिद्द मनात पक्की केली तर वयाच्या मर्यादाही त्याच्या आड येत नाहीत हे अनेक वेळा पाहिलं आहे. हरियाणाच्या भगवानी देवी यांनीही असाच एक आदर्श घालून दिला आहे. फिनलँडमध्ये झालेल्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ९४ वर्षीय खेळाडूने सुवर्ण आणि दोन कांस्यपदक जिंकले. मायदेशी परतल्यावर भगवानी देवी यांचे दिल्ली विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले. त्यावेळी आजीबाईंनी देखील धमाल डान्स केला.
९४ वर्षीय भगवानी देवी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी त्यांचे चाहते दिल्ली विमानतळावर पोहोचले. यासोबतच भगवानी देवी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. भगवानी देवी यांनीही आपला विजय अतिशय आनंदाने सेलिब्रेट केला. ढोल वाजू लागताच विमानतळावर भगवानी देवी नाचू लागल्या. या संबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पदक जिंकून भारताची मान उंचावली, यासाठी मला खूप आनंद होत असल्याचे भगवानी देवी यांनी सांगितले.
भगवान देवी यांना आता 'अॅथलेटिक्सची राणी' म्हटले जात आहे. भगवानी देवींच्या या शानदार विजयाबद्दल क्रीडा मंत्रालयाने त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, हरदीप सिंग पुरी आणि पियुष गोयल यांच्यासह इतर नेत्यांनीही भगवानी देवी यांच्या या कामगिरीवर आनंद व्यक्त केला आहे.
जागतिक मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप १९७५ मध्ये सुरू झाली. ३५ किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे खेळाडू या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यावेळी ही स्पर्धा २९ जून ते १० जुलै दरम्यान पार पडली. भगवानी देवी यांनी १०० मीटर स्प्रिंट स्पर्धेत अवघ्या २४.७४ सेकंदात सुवर्णपदक पटकावले. याशिवाय शॉटपुटमध्येही त्यांनी कांस्यपदक पटकावले.