ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर केलेल्या आरोपाबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने त्याची माफी मागितली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळला नव्हता. मालिकेचा निकाल लावणा-या या कसोटीतून माघार घेतल्याबद्दल हॉजने विराटवर टीका केली होती.
आयपीएल खेळण्यासाठी विराटने धरमशाला कसोटीतून माघार घेतली असा आरोप हॉजने केला होता. मालिकेचा निकाल लावणा-या कसोटीत तू खेळणार नाहीस आणि पुढच्या आठवडयापासून सुरु होणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार. तू शेवटच्या कसोटीत नाही खेळलास तर ते चुकीचं ठरेल, असे शब्द हॉजने विराटबद्दल वापरले होते.
ब्रॅड हॉजच्या या विधानाचा भारतातील क्रिकेटपटूंनी चांगलाच समाचार घेतला होता. या विधानामुळे आयपीएलमधील आपला रोजगार धोक्यात येऊ शकतो याची कल्पना आल्याने हॉजने विराटची माफी मागितली.
ब्रॅड हॉज गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षक आहे. मी जे विधान केले त्याबद्दल मी भारतातील लोकांची, क्रिकेट चाहत्यांची, भारताच्या क्रिकेट संघाची विशेषकरुन विराट कोहलीची माफी मागतो असे हॉजने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर म्हटले आहे. कोणावर टीकेचा, अपमान करण्याचा किंवा कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. विराटबद्दल माझ्या मनात आदर असून त्याच्याबद्दल कोणताही वाईट भावना नाही असे हॉजने आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे.
pic.twitter.com/JHtVhXH7FH— Brad Hodge (@bradhodge007) March 29, 2017