ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 7 - निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदाऱ्या रचत भारताला विजय मिळवून दिला.
206 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन चार धावा काढून माघारी परतला. मात्र फॉर्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणे 39 आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. रहाणे आपले सलग पाचवे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. तो 39 धावांवर बिशूची शिकार झाला. त्यानंतर विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील आपले 28 वे शतक पूर्ण करताना दिनेश कार्तिकसोबत (50) तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य 122 धावांची भागीदारी करत भारताला आरामात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला 9 बाद 205 धावांत रोखले. वेस्ट इंडिजचा कर्णधार होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर काइल होप आणि इविन लुईस (9) यांनी सलामीसाठी39धावांची भागीदारी करताना विंडीजला सकारात्मक सुरुवात करून दिली. ही जोडी हार्दिक पंड्याने लुईसला बाद करीत फोडली. त्यानंतर काइल होप आणि शाय होप यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. मात्र उमेश यादवने सलग दोन चेंडूंवर काइल होप आणि रॉस्टन चेज यांना तंबूत धाडले.
जेसन मोहम्मद (16) भारतीय फिरकी गोलंदाजांना अडखळत खेळत होता. त्याला केदारने स्वत:च्याच गोलंदाजीवर बाद करीत भारताला चौथे यश मिळवून दिले. पुढे होल्डर (36) आणि पॉवेल (31) यांनी विंडीजचा डाव सावरला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये विंडीजचा डाव पुन्हा गडगडला. अखेर त्यांना 50 षटकात 9 बाद 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक 51, काइल होपने 46, कर्णधार जेसन होल्डरने 36 आणि रोव्हमन पॉवेलने 31 धावा फटकावल्या.भारताकडून मोहम्मद शमीने 4, उमेश यादवने 3 तर हार्दिक पंड्या आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.