नवी दिल्ली : भारतीय संघातील सर्वांत फिट खेळाडू विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या मालिकेसाठी तयारीला सुरुवात केली आहे. कसोटी संघाचा कर्णधार असलेला विराट आपल्या नेतृत्वाखाली संघाला मालिकेत सरशी साधून देण्यासाठी घाम गाळत आहे. फिटनेसबाबत जागरुक असलेल्या विराटने आपल्या फिटनेस ट्रेनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात तो सायकलिंग आणि ट्रेड मिलवर बराच वेळ मेहनत करीत असल्याचे दिसत आहे. त्याचसोबत त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला दिसत आहे. त्यामुळे ट्रेनिंग आणखी कठीण होते. विराटने म्हटले आहे की,‘१५ मिनिट सायकलिंगनंतर थेट ट्रेड मिलवर त्यानंतर १० सेकंद विश्रांती. हे सर्व ट्रेनिंग मास्कसह करताना अतिशय कठीण ठरते. कसून मेहनत करणे आवश्यक आहे. मी सर्वांच्या स्वस्थ दिवसाची इच्छा व्यक्त करतो.’गेल्या काही वर्षांमध्ये २७ वर्षीय विराटने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष दिले आहे. महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर विराट भारतीय संघाचा सर्वांत फिट खेळाडू आहे. तो तीन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कॅरेबियन भूमीवर कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळविल्यानंतर विराटसाठी पुढचे लक्ष्य न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सरशी साधण्याचे आहे. मालिकेतील पहिली लढत कानपूरच्या ग्रीन पार्कवर २२ सप्टेंबरपासून खेळल्या जाणार आहे.(वृत्तसंस्था)
विराट होत आहे सज्ज
By admin | Published: September 15, 2016 11:36 PM