ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - एकीकडे भारतीय संघ आयसीसी चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यात व्यस्त असताना दुसरीकडे बीसीसीआयमध्ये संघासाठी नवा प्रशिक्षक निवडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विराट कोहलीने रवी शास्त्रींच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागसह, रिचर्ड पायबस, टॉम मुडी आणि सध्याचा प्रशिक्षक अनिल कुंबळे हे शर्यतीत आहेत. या उमेदवारांच्या मुलाखतींना गुरुवारपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र अनिल कुंबळेशी झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीच्या मनात प्रशिक्षकपदासाठी वेगळेच नाव आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघासाठी प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना भेटून विराटने शास्त्रीच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र बीसीसीआय शास्त्रीला मुलाखतीसाठी बोलावणार नसल्याचे कळते. तसेच शास्त्रीनेसुद्धा प्रशिक्षक पदासाठी अर्ज केलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात सर्व काही आलबेल नसल्याचे वृत्त आले होते. कर्णधार विराट कोहलीसह काही वरिष्ठ खेळाडू मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेंवर नाराज आहेत. कुंबळे यांच्या मार्गदर्शनाची पद्धत वरिष्ठ खेळाडूंना पटत नसल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर भारतातील क्रिकेट जगतात खळबळ उडाली होती.