ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ - कसोटीसोबतच, एकदिवसीय व टी-२० क्रिकेट संघाचाही कप्तान बनलेल्या विराट कोहलीने जबाबदारी शानदारपणे भूषवत नुकत्याच झालेल्या मालिकेत इंग्लंडला क्लीन स्वीप देत आपले नेतृत्वगुण सिद्ध केले. या विजयामुळे खुश असलेल्या विराटचा आनंद द्विगुणित करणारी आणखी एक बातमी आली आहे. ती म्हणजे क्रिकेटचा धर्मग्रंथ मानल्या जाणा-या 'विस्डेन' च्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान विराटला मिळाल्याने त्याच्या शिरपेचात एका मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ख्रिसमसपूर्वी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत विराटने द्विशतक ठोठावले आणि करीअरमधील सर्वोच्च धावसंख्याही (२३५) नोंदवली. एवढेच नव्हे तर कर्णधारपदाची धुरा जबाबदारीने सांभाळत इंग्लंडला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धूळ चारली. त्याच्या या यशाचे खूप कौतुक झाले आणि प्रसारमाध्यमांपासून दिगज्जापर्यंत आणि सोशल मीडियावरही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
मात्र त्याचसोबत क्रिकेटचा धर्मग्रंथ समजल्या जाणा-या विस्डेनच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मानही त्याला मिळाला आहे. २०१७ चा अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'विस्डेन'ने अंकाचे मुखपृष्ठ ट्विट केले आहे.
विस्डेनच्या अंकात झळकण्याचा मान मिळवणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी २०१४ साली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर 'विस्डेन'ने कव्हर फोटोतून त्याच्या कारकिर्दीला सलाम केला होता.
.@imVkohli on @WisdenAlmanack 2017 cover - "right moment to make him Wisden's cover star", says @the_topspin. More: https://t.co/HyuAfz558kpic.twitter.com/VJc3CWP83y— Wisden India (@WisdenIndia) February 3, 2017