ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 8 - फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या 100 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश असून यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे.
फोर्ब्सच्या 2017 मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणा-या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली 89 व्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीची एकूण कमाई दोन कोटी 20 लाख डॉलर इतकी आहे. यामधील 30 लाख डॉलर त्याने मानधन आणि पुरस्कारांच्या माध्यमातून कमावले आहेत. तर एकूण एक कोटी 90 लाख डॉलर्सची कमाई जाहिरातींच्या माध्यमातून केली आहे.
यानिमित्ताने फोर्ब्सने विराटचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहलीची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरशी होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. फोर्ब्सने लिहिलं आहे की, "विराट आपल्या जबरदस्त खेळीने सर्व रेकॉर्ड तोडत आहे, आणि 2015 मध्ये त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलं. संघात इतके युवा खेळाडू असताना विराट कोहलीचीच निवड करण्यात आली".
फोर्ब्स मॅगजीनने दिलेल्या माहितीनुसार गतवर्षी भारतीय क्रिकेट संघाकडून खेळताना मानधन आणि मॅच फीसमधून विराट कोहलीने 10 लाख डॉलर्सची कमाई केली. तसंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना 23 लाख डॉलर्सची कमाई करत इंडियान प्रीमिअर लीगमधील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडूंमध्ये समाविष्ट झाला होता. विराट कोहलीच्या कमाईतील सर्वाधिक भाग प्रायोजकत्व करारामधून येत असल्याचंही फोर्ब्सने सांगितलं आहे.