ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 10 - भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक केलं आहे. हैदराबादमध्ये बांगलादेशविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केलं आहे. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅऩ आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे.
भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतक केली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक केलं आहे.
भारताने दुस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली तेव्हा तीन विकेट्स गमावत 356 धावा होत्या. भारतीय फलंदाजांनी विशेष करुन विराट कोहलीने बांगलादेशी गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवत जोरदार बँटिंग केली. कोहलीने 111 धावांवर खेळण्यास सुरुवात केली होती. 170 चेंड्त कोहलीने 150 धावा पुर्ण केल्य. विराट कोहलीने आपल्या गेल्या पाच कसोटी शतकांमध्ये नेहमी 150 हून जास्त धावा केल्या आहेत. त्याअगोदरच्या 11 शतकांमध्ये फक्त एकदाच तो 150 च्या पुढे जाऊ शकला होता.
भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेने 226 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीच्या सोबतीने अजिंक्य रहाणेनेदेखील गोलंदाजांची धुलाई केली. रहाणेने आक्रमक खेळी करत करिअरमधील दहावं अर्धशतक पुर्ण केलं. 82 धावांवर अजिंक्य रहाणे बाद झाला.