नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कारांची गुरूवारी घोषणा झाली आणि पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना 2018चा 'खेलरत्न' पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारासाठी डावलल्याने कुस्तीपटू बजरंग पुनिया नाराज झाला असून त्याने न्यायालयाचे दार ठोठावण्याची तयारी दर्शवली आहे. या पुरस्कारासाठी निवडलेल्या विराट आणि मीराबाई यांच्या खात्यात अनुक्रमे 0 व 44 गुण आहेत, तर डावललेल्या बजरंगच्या खात्यात 80 गुण आहेत.
बजरंगने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याशिवाय त्याच्या नावावर जागतिक स्पर्धेची दोन पदकं आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्काराच्या नियमावलीप्रमाणे बजरंग प्रबळ दावेदार होता. त्यानुसारच त्याच्या गुणांची संख्या अधिक आहे. पण, म्हणून विराट कोहली आणि त्याची तुलना करणे चुकीचे आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नसल्यामुळे त्याला गुणपद्धत लागू होत नाही. क्रीडा क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो आणि विराट याही नियमात सध्यातरी बसत नसल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.