बंगळुरू : प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध शुक्रवारी आयपीएल-१० मध्ये घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांचीतील तिसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती तेव्हापासून तो बाहेर होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने त्याला फिट घोषित करताच आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला. हा संघ ३ पैकी २ सामने हरला आहे.कोहलीने काल सराव सत्रात नेटमध्ये चांगलाच घाम गाळला. मागच्या वर्षी त्याने १६ सामन्यांत चार शतकांसह ९७३ धावा केल्या. अंतिम सामन्यात मात्र आरसीबीला सनराइजर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. दहाव्या सत्रात आरसीबी सध्या सहाव्या स्थानावर आहे. कोहलीच्या गैरहजेरीत डिव्हिलियर्सने ४६ चेंडूंत नाबाद ८९ धावा ठोकल्या; पण अन्य सहकाऱ्यांची त्याला साथ न लाभल्याने पंजाबविरुद्ध सामना गमवावा लागला होता. ख्रिस गेल याचा फॉर्मदेखील संघाच्या चिंतेत वाढ करणारा आहे. गेल्या १० डावांत त्याचे एकही अर्धशतक नाही. (वृत्तसंस्था)- मुंबई संघ दोन विजय आणि एका पराभवासह तिसऱ्या स्थानावर आहे. काल रात्री पुण्याचा त्यांनी चार गड्यांनी पराभव केला. नितीश राणा याने तिन्ही सामन्यांत ३४, ५० आणि ४५ असे योगदान दिले, तर पार्थिव पटेल व जोस बटलर यांनी चांगली सुरुवात करून दिली होती.- हार्दिक पंड्या याने पहिल्या २ सामन्यांत दमदार कामगिरी केली, तर केकेआरविरुद्ध त्याचा भाऊ कुणाल पंड्या चमकला. पोलार्डचा खराब फॉर्म लक्षात घेऊन या सामन्यात असेला गुणरत्ने याला संधी मिळू शकते.
विराट कोहलीकडे आरसीबीचे नेतृत्व
By admin | Published: April 14, 2017 12:59 AM