एबी डिव्हिलियर्स लिहितो़ आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या. आम्ही बाद फेरी गाठण्याच्या उंबरठ्यावर असतानाही सहा संघ प्लेआॅफमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट््स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांनाही आगेकूच करण्याची संधी मिळाली होती. एका व्यावसायिक लीग स्पर्धेत यापेक्षा अधिक काय विचार करता येईल. निकालाची अनिश्चितता या स्पर्धेची विशेषता असून, त्यामुळे चाहते या स्पर्धेकडे आकर्षित झाले आहेत. दुसऱ्या बाबीचा विचार करता ही लीग टी-२० क्रिकेटचा विकास करण्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. येथे प्रशिक्षक व कर्णधार फलंदाज व गोलंदाजांसाठी वेगवेगळ्या रणनीती तयार करीत असतात. या सर्व बाबी खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. या लीगमुळे खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली आहे. तिसरे कारण युवा व प्रतिभावान खेळाडूंची कामगिरी. सनराझर्स हैदराबादचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानचा आघाडीच्या गोलंदाजांमध्ये समावेश आहे. फिज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोलंदाजाने आतापर्यंत या स्पर्धेत ४९ षटके गोलंदाजी केली असून, त्याने केवळ प्रतिषटक ६.६१ धावा दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माझा सहकारी व दिल्ली डेअरडेव्हिल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ख्रिस मॉरिसने ४१ षटके गोलंदाजी करताना केवळ ६.७५च्या सरासरीने धावा दिल्या. स्पर्धा संस्मरणीय ठरण्यासाठी चौथी व सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहलीची अनन्यसाधारण फलंदाजी. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आमच्या अखेरच्या साखळी लढतीपूर्वी त्याने १३ डावांमध्ये ८६.५०च्या सरासरीने ८६५ धावा फटकावल्या आहेत. खेळाच्या इतिहासात कुठल्याही फलंदाजासाठी हा सर्वोत्तम फॉर्मपैकी एक आहे. तो केवळ आयपीएलमध्येच फॉर्मात आहे असे नसून यंदा जानेवारी महिन्यापासून त्याने कामगिरीत सातत्य राखले आहे, हे विसरता येणार नाही. त्याने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० सामन्यांत १९९ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर टी-२० आशिया कप स्पर्धेत चार सामन्यांत १५४ आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये पाच लढतीत २७३ धावा फटकावल्या. आतातर ही सर्व कामगिरी आयपीएलसाठी वॉर्म असल्याचे भासत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने फटकावलेल्या बऱ्याच धावांचा मी साक्षीदार आहे. विशेषत: नॉन स्ट्रायकर एन्डवर उभे राहून मी त्याच्या फलंदाजीचा आनंद घेतला आहे. अचूक टायमिंग व अचूक प्लेसमेंटच्या आधारावर तो मैदानात चौफेर शानदार फटकेबाजी करतो, ते बघून आश्चर्य वाटते. त्यामुळे विराट कोहलीच खरा मिस्टर ३६० आहे. आतापर्यंतच्या सर्वोत्तम आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू... विराट. (टीसीएम)
विराट कोहली खरोखरचा मिस्टर ३६०
By admin | Published: May 22, 2016 2:34 AM