सिडनी : नजरेला नजर भिडवित प्रतिस्पर्ध्यांना उत्तर देण्याची विराट कोहलीची वृत्ती त्याच्या कर्णधारपदाच्या शैलीमध्ये झळकेल आणि त्यामुळे भारतीय संघात आक्रमकता येईल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने व्यक्त केली.चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांदरम्यान कोहली व जॉन्सन यांच्यादरम्यान अनेकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. पहिल्या दोन सामन्यांत विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलिया संघाने तिसरा सामना अनिर्णित राखत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. जॉन्सन म्हणाला, ‘भारतीय संघ आक्रमक खेळासाठी ओळखला जात नाही, पण मी विराटला नेहमीच आक्रमक बघितले आहे. त्यामुळे विराट नक्कीच आक्रमक कर्णधार असेल. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या तुलनेत तुम्हाला वेगळे बघायला मिळेल. प्रतिस्पर्धी कुणीही असले, तरी कोहलीच्या वर्तनामध्ये फरक दिसत नाही. तो नेहमीच प्रतिस्पर्ध्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज असतो.’ भारताविरुद्धच्या मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांच्या तुलनेत फलंदाजीसाठी अधिक अनुकूल ठरल्या आहेत. त्यामुळे कर्णधार स्टिव्हन स्मिथ व प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना जॉन्सनचा अधिक वापर करावा लागला. या व्यतिरिक्त पीटर सिडल संघाबाहेर असल्यामुळे आणि रॅन हॅरिस दुखापतग्रस्त असल्यामुळे जॉन्सनला अधिक गोलंदाजी करावी लागली. ‘गाबाची खेळपट्टी लौकिकाला साजेशी नव्हती. तेथे चेंडूला थोडी उसळी मिळत होती, ती खेळपट्टी फलंदाजांना अधिक अनुकूल होती.’विश्वकप स्पर्धेपूर्वी खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेच्या पहिल्या टप्प्यात जॉन्सनला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.(वृत्तसंस्था)
विराटच्या नेतृत्वाखाली आक्रमकता येईल : जॉन्सन
By admin | Published: January 03, 2015 1:43 AM