ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ५ - क्रिकेटमध्ये २०१६ हे वर्ष सर्वार्थाने गाजवले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीने. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटने धावांचा पाऊस पाडला. त्याबरोबरचा आपल्या कुशल नेतृत्वाखाली भारताला कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानीही पोहोचवले. आता विराटच्या या कामगिरीची दखल क्रिकेटमधील बायबल अशी ओळख असलेल्या विस्डेनने घेतली असून, विराटची २०१६ मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे. असा मान पटकावणार विराट हा भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरनंतरचा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
या आठवड्यात प्रकाशित झालेल्या विस्डेनच्या २०१७ च्या वार्षिकांकाच्या मुखपृष्ठावर स्थान स्थान देण्यात आले आहे. विराटने २०१६ मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्राकारात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून २ हजार ५९५ धावा कुटल्या. त्यामध्ये ७ शतके आणि १३ अर्धशतकांचा समावेश होता. विराटने १२ कसोटीत ४ शतकांसह १२१५ धावा फटकावल्या. तर १० एकदिवसीय सामन्यात ७३९ धावा कुटल्या. तसेच १५ ट्वेन्टी-२० सामन्यात विराटने ६४१ धावांची बरसात केली.
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी हिची वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. तसेच विस्डेनच्या अव्वल ५ क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानच्या मिसबा उल हक आणि युनिस खानला स्थान देण्यात आले आहे. ख्रिस व्होक्स, रोलैंड जोन्स आणि बेन डकेट हे या पाच क्रिकेटपटूंमध्ये स्थान मिळवणारे अन्य तीन क्रिकेटपटू आहेत.
विस्डेनचे संपादक लॉरेन्स बुन विराटचे कौतुक करताना लिहितात, "विराटसाठी २०१६ हे वर्ष स्वप्नवत राहिले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विराटची सरासरी इतर कुठल्याही फलंदाजाच्या तुलनेत अधिक राहिली. कसोटीत ७५, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९२ आणि ट्वेंटी-२०त १०६च्या सरासरीने त्याने धावा कुटल्या. तसेच या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतके फटकावण्याचा पराक्रमही त्याने केला."
2003 पासून विस्डेनने वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तीन भारतीयांनी हा मान पटकावला आहे. त्यात विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने २००८ आणि २००९ अशा सलग दोन वर्षांमध्ये विस्डेनचा सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला होता.