ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 3 - ऑस्ट्रेलियाविरोधात पुण्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवाने भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीला खूप काही शिकवलं आहे. आपला संघ उत्तम प्रदर्शन करत पुनरागमन करेल असा विश्वास विराट कोहलीने व्यक्त केला आहे. पहिल्या सामन्यात ज्या प्रकारे खेळलो तसं खेळप्रदर्शन पुन्हा करणार नाही असा आश्वासन कोहलीने चाहत्यांना दिलं आहे.
गेल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवावर बोलताना कोहली बोलला की, 'अशा प्रकारच्या पराभवाला तुम्ही नक्कीच विसरणं पसंद कराल. जेव्हा एखादा निकाल आपल्याबाजूने नसतो, तेव्हा झालेला पराभव तुमच्या जिव्हारी लागणं फार महत्वाचं असतं. त्या पराभवातून तुम्ही शिकणं महत्वाचं असतं. जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुम्ही कधीच काही शिकू शकणार नाही'. 'आपल्या कमतरतेमुळे आपला पराभव झाला हे मान्य करणं महत्वाचं असतं. विरोधी संघ आपल्यापेक्षा चांगला खेळला हे मान्य करणंही तितकंच महत्वाचं आहे', असंही विराट कोहलीने सांगितलं आहे.
पुढे बोलताना कोहली म्हणाला की, 'याचा अर्थ आम्ही प्रत्येक कसोटी सामना अशाचप्रकारे खेळू असा होत नाही. जर तुम्ही प्रत्येक दिवस, सत्रात चांगला खेळलात तर कसोटी सामना जिंकता, जे आम्ही नाही करु शकलो. जे आम्हाला माहित आहे त्यावर भर देत सुधरवण्याचा प्रयत्न करु. मालिका संपेपर्यंत पुन्हा असं प्रदर्शन पाहायला मिळणार नाही याचं आश्वासन मी तुम्हाला देऊ शकतो'.
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 333 धावांनी दारुण पराभव केला आहे. गेल्या दोन वर्षातील हा अत्यंत खराब खेळ होता हे स्वत: कोहलीने मान्य केलं होतं. पहिला सामना हरल्याने भारत मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेत पुनरागमन करणं भारतासाठी सोपी गोष्ट नाही, कारण 1932 मध्ये कसोटी खेळण्यास सुरुवात केल्यापासून आतापर्यत फक्त तीन वेळाच भारतीय संघ पहिला सामना हरल्यानंतर मालिकेत यशस्वी कामगिरी करण्यास यशस्वी झाला आहे.