बंगळुरू : शानदार फॉर्मात असलेला कर्णधार विराट कोहली याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने शनिवारी महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट््स संघाचा ७ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात तिसऱ्या विजयाची नोंद केली. पुणे संघाने प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे व सौरभ तिवारी यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर ६ बाद १९१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना बंगलोर संघाने विजयासाठी आवश्यक धावा १९.३ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. कोहलीने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात दुसरे शतक झळकावताना ५९ चेंडूंमध्ये नाबाद १०८ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना बँगलोर संघाची सुरुवात चांगली झाली. कोहली व लोकेश राहुल यांनी सलामीला ६६ चेंडूंमध्ये ९४ धावांची भागीदारी केली. राहुलला अॅडम जाम्पाने बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. राहुलने ३५ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर एबी डिव्हिलियर्स (१) बाद झाल्यामुळे बँगलोरचा संघ अडचणीत आला. त्यानंतर शेन वॉटसनने कोहलीला योग्य साथ देताना १३ चेंडूंमध्ये ३६ धावा फटकावल्या. त्यात ५ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. टी-२० विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टूर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या कोहलीने आयपीएलच्या नवव्या सत्रात ८ सामन्यांत ९०.१६च्या सरासरीने ५४१ धावा फटकावल्या आहेत. त्यात दोन शतके व चार अर्धशतकांचा समावेश आहे. आॅरेंज कॅपचा मानकरी कोहलीनंतर सर्वाधिक धावा रहाणेच्या (१० सामने, ४१७ धावा) नावावर आहेत. त्याआधी, अजिंक्य रहाणेच्या (७४ धावा, ४८ चेंडू) अर्धशतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंट्सने ६ बाद १९१ धावांची दमदार मजल मारली. धावफलकरायझिंग पुणे सुपरजायंट््स : अजिंक्य रहाणे त्रि.गो. वॉटसन ७४, उस्मान ख्वाजा धावबाद १६, सौरभ तिवारी यष्टिचित राहुल गो. चहल ५२, महेंद्रसिंह धोनी झे. रसूल गो. वॉटसन ९, तिसारा परेरा झे. वॉटसन गो. जॉर्डन १४, जॉर्ज बेली झे. राहुल गो. वॉटसन ०, रजत भाटिया नाबाद ९, आर. आश्विन नाबाद १०. अवांतर : ७. एकूण : २० षटकांत ६ बाद १९१. गोलंदाजी : जॉर्डन ४-०-४३-१, वॉटसन ४-०-२४-३, चहल ४-०-३८-१.रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली नाबाद १०८, के. एल. राहुल झे. बेली गो. जाम्पा ३८, एबी डिव्हिलियर्स झे. परेरा गो. जाम्पा १, शेन वॉटसन पायचित गो. आर. पी. सिंग ३६, ट्रॅव्हिस हेड नाबाद ६. अवांतर : ६. एकूण : १९.३ षटकांत ३ बाद १९५. गोलंदाजी : आर. पी. सिंह ४-०-३७-१, जाम्पा ४-०-३५-२.
कोहलीची शतकी खेळी
By admin | Published: May 08, 2016 3:20 AM