ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅंम्पियन्स ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. त्यातच भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र पाकिस्तान नव्हे तर इंग्लंडबरोबर अंतिम लढत व्हावी, असे वाटते.
भारतीय दूतावासाकडून लॉर्डसवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना विराट म्हणाला, "उपांत्य फेरीत तुमचा विरोधी संघ कोण आहे याला आम्ही फार महत्त्व देणार नाही. या स्पर्धेची साखळी फेरी आव्हानात्मक होती. आता आम्ही अंतिम फेरीपासून केवळ एक विजय दूर आहोत. तसेच 18 तारखेला भारत आणि इंग्लंड यांच्यातच अंतिम लढत व्हावी, अशी सर्वांची इच्छा आहे. आता दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत चांगली कामगिरी केली तर क्रिकेटप्रेमींना ही लढत पाहायला मिळेल." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य लढतीत यजमान आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने येतील. तर दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताची गाठ बांगलादेशशी पडणार आहे.
लॉर्डसवर भारतीय दूतावासाने टीम इंडियासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे उपस्थित होते. " भारताच्या प्रत्येक सामन्याला क्रिकेटप्रेमींची मोठ्या संख्येने असलेली उपस्थिती पाहिली की बरे वाटते. वातावरण चांगले असेल तर क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडपेक्षा चांगली जागा दुसरी असू शकत नाही. सध्या येथे चेंडू नेहमीप्रमाणे स्विंग होत नाही आहे, पण ढगाळ वातावरण असले की फलंदाजी करणे कठीण होत आहे. इंग्लंडमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो," असेही विराटने यावेळी सांगितले.