नवी दिल्ली : टीम इंडिया कसोटी संघाचा कर्णधार आणि सध्याचा सर्वांत लोकप्रिय फलंदाज विराट कोहली याच्या नावाची शिफारस भारतीय क्रिकेट बोर्डाने सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’साठी केली आहे. कोहलीला हा पुरस्कार हमखास दिला जाईल असे वाटत होते; पण क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानंतर त्याला आता रिओ आॅलिम्पिक संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.रिओ आॅलिम्पिकमध्ये जो खेळाडू वैयक्तिक कामगिरीत पदक जिंकेल, त्याच्या नावाचा विचार ‘खेलरत्न’ तसेच ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी केला जाईल, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने या घोषणेमागील तर्क देताना म्हटले की, आॅलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूला प्रोत्साहन मिळावे, शिवाय पदक जिंकल्यानंतर त्याच्या वाट्याला वर्षभराची प्रतीक्षा येऊ नये. खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी आॅलिम्पिकला प्रथम प्राधान्य देण्याचा मंत्रालयाने निर्णय घेतल्याने विराटला आता आॅलिम्पिक संपण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याआधी असे मानले जात होते, की सर्वांत दमदार क्रिकेटपटू असलेल्या विराटला हा पुरस्कार सहज मिळू शकेल. मागच्या वर्षी टेनिस स्टार सानिया मिर्झा हिला तिच्या कामगिरीच्या आधारेच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तथापि त्या वेळी पॅरालिम्पियन एच. एस. गिरीशा याने सरकारच्या सानियाला पुरस्कार देण्याच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. मंत्रालय मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सानियासारखीच स्थिती विराटचीदेखील होऊ शकली असती; पण आॅलिम्पिकमधील कामगिरीचा विचार करण्याची अट समोर येताच विराटला हा सन्मान मिळेलच याची खात्री नाही. विराटने २०१६ मध्ये तडफदार फलंदाजी केली. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषकात तो ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ होता. त्याने फलंदाजीच्या बळावर भारताला उपांत्य फेरी गाठून दिली. आयपीएल नऊमध्ये विराटने चार शतकांसह विक्रमी ९०० धावा केल्या. कसोटीत तो सचिनला तर वन डेत धोनीच्या फलंदाजीला आव्हान देत आहे. सरकारचा नवा फतवा पुढे आला नसता तर येत्या २९ आॅगस्ट रोजी विराटला ‘खेलरत्न’ने गौरविणे निश्चित होते. आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू किती पदके जिंकतात याकडे अनेकांचे लक्ष आहे. ज्या खेळाडूंना अद्याप हा पुरस्कार मिळाला नाही आणि जे रिओमध्ये पदक जिंकतील त्यांच्यापैकी कुणाला तरी हा पुरस्कार देण्यात येईल. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताने दोन रौप्यांसह सहा पदकांची कमाई केली. पदक विजेत्यांपैकी सुशील, नेमबाज गगन नारंग, मेरीकोम, सायना नेहवाल यांना आधीच ‘खेलरत्न’ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे अन्य दोन पदक विजेते नेमबाज विजय कुमार आणि मल्ल योगेश्वर दत्त यांना ‘खेलरत्न’ने गौरविण्यात आले होते. यंदा काही नवे खेळाडू पदक जिंकण्यात यशस्वी ठरले तर त्यांना ‘खेलरत्न’ मिळेल. पण भारताच्या पदरी निराशा पडली आणि जुने खेलरत्न विजेते पदकाचे मानकरी ठरले तर मात्र विराटला खेलरत्न मिळण्याची प्रबळ शक्यता राहील. (वृत्तसंस्था)आॅलिम्पिक वर्षांत हा पुरस्कार एकापेक्षा अधिक खेळाडूंना देता येईल, असा निर्णय सरकारने आधीच घेतला आहे. २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकनंतर मल्ल सुशील कुमार, बॉक्सर विजेंदरसिंग आणि पाच वेळा विश्व चॅम्पियन राहिलेली महिला बॉक्सर एम. सी. मेरीकोम यांना एकाच वेळी ‘खेलरत्न’ने सन्मानित करण्यात आले होते.
‘खेलरत्न’साठी विराट ‘रिओ’च्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 3:58 AM