नवी दिल्ली : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग चार मालिका जिंकल्या आहेत; पण विश्वकप विजेता कर्णधार कपिल देव यांच्या मते मात्र त्याला अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे. एका चॅनेलवरील चर्चेत कपिल देव म्हणाले, ‘विराट सध्या संघाचे नेतृत्व योगपद्धतीने सांभाळत आहे. त्याच्याकडे प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्यासाठी सर्व अस्त्र-शस्त्र आहेत. कर्णधार म्हणून विराटला मोठा पल्ला गाठायचा आहे. त्याला आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये स्वत:ला सिद्ध करायचे आहे. त्यानंतरच तो किती चांगला कर्णधार आहे, हे निश्चित सांगता येईल. सध्या तो ज्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करीत आहे ते बघता तो प्रशंसेस पात्र आहे.’ कपिल यांनी सांगितले की, ‘भारतीय संघाला सलग तीन मालिकेत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याची चांगली संधी आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवीत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी चांगला सराव केला आहे. इंग्लंड संघासाठी बांगलादेश दौरा विशेष चांगला गेला नाही. इंग्लंडने भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी बांगलादेश दौरा केला. त्यामुळे त्यांना उपखंडातील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास मदत होईल.’सहाव्या स्थानावर हार्दिक पंड्या उपयुक्त ठरू शकतो, असे सांगताना कपिल देव म्हणाले, ‘हार्दिक च्या समावेशामुळे संघाचा समतोल साधला गेला आहे. तो प्रतिभावान खेळाडू असून, तो किती लवकर परिपक्व होतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.’
विराटला मोठा पल्ला गाठायचा आहे : कपिल
By admin | Published: November 08, 2016 3:43 AM