ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि 25 - गेल्या लढतीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे विराट-वॉर्नर ही लढत रोमांचक ठरेल.
आयपीएलच्या इतिहासात नीचांकी धावसंख्येवर पराभूत होणयाची वेळ विराट अँड कंपनी गेल्या सामन्यात आली होती. या सामन्यात आरसीबीच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नव्हती. सात सामन्यांत केवळ चार अंकांची कमाई करणारा आरसीबी संघ गुणतालिकेत सर्वांत तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. त्यांच्या तीन स्टार फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.
त्यात कोहली (४ सामने १५४ धावा), ख्रिस गेल (पाच सामने १४४ धावा) आणि एबी डिव्हिलियर्स (४ सामने १४५ धावा) यांचा समावेश आहे. केदार जाधवने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली, पण येथे सात सामन्यांत त्याला केवळ १७५ धावा करता आल्या. भेदक वेगवान माऱ्यापुढे त्याचे तंत्र साधारण ठरले. कोहलीला संघसहकाऱ्यांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, दुसऱ्या बाजूचा विचार करता सनरायझर्सच्या खात्यावर ८ गुणांची नोंद असून, हा संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहे.