नवी दिल्ली : सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहली देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ठरले आहे. फोर्ब्स इंडियाने २०१६ या वर्षांतील देशातील लोकप्रिय व्यक्तींची यादी जाहीर केली असून, त्यात विराट कोहलीने लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूड स्टार सलमान खान आणि शाहरूख खान यांनाही मागे टाकले आहे. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर क्रि केट जगतातील महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या दोन मातब्बर खेळाडूंपेक्षाही कोहली वरचढ ठरला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीतदेखील कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहली वर्षभरातील १३४.४४ कोटींच्या कमाईसह अव्वल स्थानावर आहे. धोनी १२२.४८ कोटींच्या कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे.लोकप्रियतेच्या यादीत कोहलीनंतर सलमान आणि शाहरूख यांचा नंबर लागतो. धोनी चौथ्या आणि ‘बिग बी’ अमिताभ बच्चन पाचव्या क्रमांकावर आहेत. एकूण कमाईच्याबाबतीत खेळाडूंपेक्षा बॉलिवूड कलाकारांनी बाजी मारली आहे. सलमान खान २७० कोटींसह सर्वाधिक कमाई करणारा स्टार असल्याचे फोर्ब्सने जाहीर केले आहे. शाहरूख खान २२१.७५ कोटींसह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक कमाईच्या सेलिब्रिटींच्या यादीत टेलिव्हिजन कॉमेडी शो कलावंत कपिल शर्मादेखील मागे नाही. कपिल कमाईच्या यादीत सातव्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)
विराटची कमाई सचिनपेक्षा दुप्पट; लोकप्रियतेतही अग्रेसर
By admin | Published: December 24, 2016 1:16 AM