ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत भारतासमोर बांगलादेशचे आव्हान असल्यामुळे आपण अंतिम फेरीत पोहोचलो असा भारतीय क्रिकेटप्रेमींनी समज करुन घेऊ नये. कारण आता बांगलादेशचा संघ पहिल्यासारखा कमकुवत राहिला नसून, मातब्बर संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यापूर्वी दोनवेळा वर्ल्डकपसारख्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये बांगलादेशने भारतीय संघाला हादरवून सोडले आहे. 2007 च्या वर्ल्डकपच्या आठवणी आजही क्रिकेटप्रेमींच्या मनात ताज्या आहेत. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाल्याने भारतीय संघाचा पुढचा मार्ग कठीण बनला आणि पुढे आव्हान संपुष्टात आले. मागच्यावर्षी 2016 मध्ये टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात भारताने बांगलादेशवर अवघ्या 1 धावेने विजय मिळवला होता. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखणे किंवा गाफील राहून चालणार नाही. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बांगलादेशने बलाढय संघांवर मिळवलेल्या विजयामुळे स्पर्धेची समीकरणेच पार बिघडून गेली. बांगलादेशच्या पाच मोठया विजयांचा आढावा घेऊया.
- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड
- चॅम्पियन्स ट्रॉफीत ग्रुप ए मध्ये बांगलादेशचा संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळायला उतरला त्यावेळी कोणीही बांगलादेशला विजयासाठी पसंती दिली नव्हती. बांगलादेशने टॉस हरल्यानंतर किवींनी कार्डीफच्या मैदानावर फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात एकवेळ न्यूझीलंडचा डाव 3 बाद 201 अशा सुस्थितीत होता. पण रॉस टेलर बाद होताच न्यूझीलंडचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 265 धावात गारद झाला.
बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला तेव्हा त्यांची अत्यंत निराशाजनक सुरुवात झाली होती. अवघ्या 33 धावात बांगलादेशचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण शाकीब अल हसन आणि महमदुल्लाह या दोघांनी खेळपट्टीवर पाय रोऊन शानदार शतके झळकवली आणि एक अशक्यप्राय वाटणा-या विजयाची नोंद केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली.
आणखी वाचा
- वर्ल्डकप 2015 बांगलादेश विरुद्ध इंग्लंड
अॅडलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीची संधी दिली. अवघ्या 8 धावात त्यांनी सलामीचे दोन फलंदाज गमावले. पण सौम्य सरकार आणि महमदुल्लाह यांनी भागीदारी करुन डावाला आकार दिला. सरकार 40 धावांवर बाद झाल्यानंतर महमदुल्लाहने मुशाफीकूर रहीमच्या साथीने संघाला स्थैर्य मिळवून दिले. महमदुल्लाहने शतक तर रहीमने 89 धावा केल्या. बांगलादेशने 275 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्यानंतर इंग्लंडचा डाव 260 धावात आटोपला. एका बलाढय संघावर बांगलादेशने 15 धावांनी विजय मिळवला.
- वर्ल्डकप 2011 बांगलादेश विरुद्ध इंग्लंड
बांगलादेशने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. इंग्लंडने 50 षटकात 225 धावा केल्या. बांगलादेशने इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली पण मधल्या षटकात त्यांचा डाव गडगडला. एकवेळ त्यांची स्थिती 8 बाद 169 होती. त्यावेळी शफीउल इस्माल खेळपट्टीवर उभा राहिला. त्याने महमदुल्लाहच्या साथीने 21 चेंडूत 24 धावा केल्या आणि बांगलादेशने अटीतटीच्या सामन्यात एक षटक राखून विजयाची नोंद केली.
- 2007 वर्ल्डकप बांगलादेश विरुद्ध भारत
या वर्ल्डकप स्पर्धेमध्ये बांगलादेशच्या संघाने सर्वात मोठया धक्कादायक निकालाची नोंद केली. ज्यामुळे कोटयावधी भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले. त्याआधीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अंतिमफेरीत खेळला होता. राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. कागदावर बलाढय असलेला भारतीय संघ फक्त 191 धावात ढेपाळला. बांगलादेशने सावध आणि संयमी सुरुवात केली. मुशाफीकूर रहिमने 49 व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर विजयी धाव घेतली आणि साखळीतच बाद होण्याचे संकट भारतासमोर उभे राहिले.
वर्ल्डकप 1999 बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान
त्यावेळी पाकिस्तानी संघात सईद अन्वर, शाहीद आफ्रिदी, इजाज अहमद, इंजमाम उल हक, सलीम मलिक असे एकाहून एक सरस क्रिकेटपटू होते. पण तरीही बांगलादेशने पाकिस्तानवर 62 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने बांगलादेशला फलंदाजीची संधी दिली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 223 धावा केल्या. पाकिस्तान हे आव्हान सहज पार करेल असे वाटत असतानाच पाकिस्तानचा डाव अवघ्या 161 धावात संपुष्टात आला.