ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची निवड होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून अंदाज लावले जात आहेत. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री सर्वात पुढे असल्याचा अंदाज जवळपास सर्वांनीच वर्तवला होता. सोमवारी क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. जवळपास चार तास चाललेल्या या मॅरेथॉन सेशनमध्ये विरेंद्र सेहवाग बाकीच्या उमेदवारांवर भारी पडल्याचं चित्र आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीला विरेंद्र सेहवागने चांगलंच प्रभावित केलं आहे. विरेंद्र सेहवागने समितीसमोर आपला पुढील 2019 वर्ल्ड कपपर्यंतचा आपला प्लान मांडला होता.
आणखी वाचा
क्रिकेट सल्लागार समिती भारतीय कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेणार आहे. विराटशी चर्चा केल्यानंतरच अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे. याचा अर्थ क्रिकेट सल्लागार समिती विराट कोहलीकडून मंजूरी घेणार असा नाही.
‘वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे. कर्णधार कोहलीशी चर्चा करून निर्णय घेऊ,’ असं भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुलीने मुलाखतीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात मुख्य शर्यत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, आता सीएसीच्या भूमिकेनंतर असे दिसत नाही. प्रशिक्षकपदाच्या अंतिम निवडीची घोषणा पुढे ढकलणे आणि सेहवागची प्रत्यक्ष मुलाखत दोन तास रंगणे, यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये केवळ सेहवाग एकटाच प्रत्यक्षपणे बीसीसीआय सेंटरवर उपस्थित होता.
यामुळेही शास्त्री यांची पीछेहाट झाल्याची चर्चा रंगत आहे. शास्त्री यांनी सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता, परंतु जेव्हा बीसीसीआयने अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ जुलैपर्यंत वाढवली, तेव्हा शास्त्री यांनी लगेच आपला अर्ज भरला. शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असून संघ निर्देशक म्हणून त्यांची मागची कामगिरी चांगली आहे. दरम्यान, शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असले तरी सीएसी सदस्य गांगुलीसह त्यांचे मतभेद आहेत आणि हीच त्यांची मुख्य अडचण ठरू शकते.
दुसरीकडे, सेहवागचे सर्व खेळाडूंसह आणि मुख्य म्हणजे सीएसी सदस्यांसह खूप चांगले संबंध आहेत. परंतु, प्रशिक्षक म्हणून तो पिछाडीवर आहे. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटॉर राहिला, मात्र संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. उच्चस्तरावरील प्रशिक्षकपदाचा सेहवागकडे कोणताही अनुभव नाही.