तरुण टेबल टेनिस खेळाडू विश्वा दीनदयाल यांचे रविवारी अपघातात निधन झाले. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी तो गुवाहाटीवरुन शिलांगकडे जात असताना त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. 18 वर्षीय विश्वासह या टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हेही गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
केंद्रीय कायदामंत्री किरन रिजीजू यांनी विश्वाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. रिजीजू यांनी ट्विट करुन विश्वा यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, ''तामिळनाडूचे युवा टेनिस खेळाडू विश्वा दिनदयाल यांच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झालं. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी ते जात असताना मेघालयच्या री भोई येथे ही दुर्घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,'' असे ट्विट रिजीजू यांनी केले आहे.