टिबलिसी (जॉर्जिया) : भारताचा स्टार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला कॅनडाच्या एंटन कोवालयोवविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागल्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेच्या प्रवेशापासून मुकावे लागले. तसेच, पी हरिकृष्णाही विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.कोवालयोवविरुद्ध पहिली लढत गमावल्यानंतर दुसºया सामन्यात आनंदला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय अनिवार्य होता. मात्र, विजय मिळवण्यात आनंद अपयशी ठरला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत ३१ चालींनंतर आनंदने बरोबरी मान्य केली. आनंदला पुढील वर्षी कँडिडेट्स स्पर्धेत वाईल्ड कार्ड मिळाले नाही, तर या पराभवामुळे २०१८ साली होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याच्या आनंदच्या आशा संपुष्टात येतील.नियमांनुसार स्पर्धेत एक वाईल्ड कार्ड प्रवेश दिला जातो. जर आनंदला कार्ड मिळाले नाही, तर त्याला २०२० सालच्या जागतिक स्पर्धेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. सफेद मोहºयांनी खेळत असलेल्या कोवालयोवने इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात केली. आनंदने ही कोंडी फोडण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु, त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे, भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णाही दुसºया फेरीतून आगेकूच करण्यात अपयशी ठरला. भारताच्याच एस. पी. सेतुरमणविरुद्ध टायब्रेकमध्ये पराभूत झाल्यानंतर त्याच्या आशा संपुष्टात आल्या. (वृत्तसंस्था)
विश्वनाथन आनंद विश्वचषक स्पर्धेला मुकणार, पी हरिकृष्णाही विश्वचषक स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:27 AM