लिडेन (नेदरलँड) : टाटा स्टील बुद्धिळबळ स्पर्धेत भारताच्या विश्वनाथन आनंदला गुरुवारी पराभवाचा धक्का बसला. दहाव्या फेरीत आनंदला जगजेत्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे आनंदच्या सहाव्यांदा जगजेतेपद मिळवण्याच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.आनंदने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली होती. मात्र या पराभवामुळे आनंदच्या विजेतेपदाची शक्यता जवळपास संपुष्ठात आली आहे. कार्लसनने सात गुणांसह आघाडी घेतली आहे. अनिश गिरी त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहे. आनंदचे सहा गुण असून तो चीनच्या किंग लिरेन व नेपोमिनियाची यांच्यासह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.विज्क आॅन जी येथील लढतीनंतर लिडेनमध्ये लढत होत आहेत. अन्य सामन्यात भारताच्या विदीत गुजराती याने रशियाच्या ब्लादिमिर क्रमॅनिकला पराभूत केले.स्थानिक खेळाडू अनिश गिरी व जॉर्डन वॉन फोरिस्ट यांनी आपापल्या लढती जिंकल्या त्यांनी अनुक्रमे ब्लादिमीर फेदोसिव्ह व इयान नेपोमिनियाची यांना पराभूत केले. हंगेरीच्या रिचर्ड रैपोर्टने पोलंडच्या ख्रिस्तोफला पराभूत केले.
मॅग्नस कार्लसनकडून विश्वनाथन आनंद पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 6:20 AM