मुंबई : 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस 2019' साठी क्रीडा क्षेत्रामध्ये गेल्या वर्षात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना नामांकन देण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता महाराष्ट्राच्या मातीतील राहुल आवारेचा समावेश करण्यात आला आहे. भारताच्या महिला क्रिकेटमध्ये देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि अनुजा पाटील यांनाही नामांकन देण्यात आली आहे. महिला कुस्तीमध्ये महाराष्ट्राला अनोखी ओळख निर्माण करणारी भाग्यश्री फंड आणि जलतरण या खेळात दमदार कामगिरी करणाऱ्या ओम राजेश अवस्थी यांनाही नामांकन देण्यात आले आहे.
नामांकित खेळाडूंचा अल्प परीचय
राहुल आवारे : २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुलने भारताला ५७ किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक जिंकून दिले आणि हा तरुण देशाच्या नकाशावर चर्चेत आला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राहुलला राज्य सरकारतर्फे शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज : न्यूझीलंडच्या महिला संघाविरूद्ध त्यांच्याच देशात नाबाद ८१ धावांची धडाकेबाज खेळी करणारी १८ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही वीरेंद्र सेहवागच्या तंत्राची पाईक आहे. जेमिमाने १९ वर्षांखालील स्पर्धेत गुजरातच्या गोलंदाजांना धुताना १४२ चेंडूत १७८ धावांची तडाखेबंद खेळी केली होती. जेमिमाने वयाच्या १८व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली.
अनुजा पाटील : भारतीय महिला क्रिकेट विश्वातील चमकता तारा असलेल्या अनुजा पाटील हिची २०१७ साली बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय ‘अ’ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. ऑक्टोबर २०१८ मध्ये तिची श्रीलंका येथे टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. सलग दुसऱ्या वर्षी तिला कर्णधारपदाची संधी मिळाल्यावर तिने भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व केले.
भाग्यश्री फंड : २०१७ मध्ये झालेल्या खेलो इंडियामध्ये भाग्यश्रीने ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळविले. नुकत्याच झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले. केंद्रीय सुरक्षा दलातर्फे झालेल्या डी. जी. स्पोर्टसमध्ये तिने छाप पाडली होती. २०१६ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत ती रौप्यपदकाची मानकरी ठरली होती.
ओम राजेश अवस्थी : ओम याने आतापर्यंत २ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत १ सुवर्ण आणि २ रौप्यपदके देशासाठी जिंकली आहेत. २०२०, २०२४ आणि २०१८ च्या ऑलिम्पिकसाठी निवडलेल्या भारताच्या संभाव्य खेळाडूंत त्याची निवड झाली आहे. वयाच्या दहाव्या वर्षी ओम डायव्हिंगकडे वळला. त्याच वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण जिंकत त्याने आपली क्षमता दाखविली. तेव्हापासून ६ वर्षे त्याची कामगिरी सातत्याने नवी उंची गाठत आहे.