ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्याविषयी बोलताना त्याच्याबद्दलची एक गंमतीशीर आठवण सांगितली. वेंगसरकरांनीच धोनीला पहिल्यांदा कर्णधारपदाची संधी दिली. 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदी धोनीची निवड झाली त्यावेळी दिलीप वेंगसकर निवड समितीचे अध्यक्ष होते.
ज्यावेळी मी धोनीला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचा स्वभाव याबद्दल मला फार माहिती नव्हती. त्याच्याबरोबर मला बोलायचे होते. मॅच पाहण्यासाठी तो कोलकात्यातून मुंबईला जाणार असल्याचे जेव्हा मला समजले. तेव्हा त्याच्याबरोबर बोलता येईल म्हणून मी त्याच्यासोबत विमानाने जाण्याचा निर्णय घेतला.
बिझनेस क्लासमध्ये आम्ही दोघे शेजारी बसलो होतो. अडीच तासांचा प्रवास होता. त्याच्याबद्दल जाणून घेता येईल म्हणू मी उत्सुक्त होतो. विमान हवेत झेपावताच धोनीचा डोळा लागला. तो थेट उठला ते विमानाने मुंबई विमान तळावर लँड केल्यानंतर. त्याला मी कर्णधार बनवले पण त्याच्याशी बोलता आले नाही अशी आठवण दिलीप वेंगसरकरांनी सांगितली.
धोनी चांगले वर्तन असलेला नम्र स्वभावाचा मुलगा असल्याचे वेंगसरकरांनी सांगितले. धोनीला टी-20 संघाचा कर्णधार बनवले तेव्हा तो स्टेट लेव्हलवरही कर्णधार नव्हता. पण त्याचा एकंदर खेळाबद्दलचा दृष्टीकोन आणि ज्या पद्धतीने मैदानावर त्याचा वावर होता त्याने मला आकर्षित केले. त्याच्यामध्ये चांगल्या नेत्याची चुणूक दिसली. संघात अनेक सिनियर खेळाडू असूनही त्याने चांगल्या पद्धतीने सगळयांना हाताळले.