कराची : टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच मैदानाबाहेरील घडामोडीने चर्चेत राहिलेल्या पाकिस्तान संघाच्या नुकताच झालेल्या काही स्पर्धेतील कामगिरीचा अहवाल संघाचे प्रशिक्षक वकार युनिस यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांच्याकडे सोपविला आहे. त्याचवेळी वकार यांनी यावेळी देशाची माफी मागताना राजीनाम देण्यास तयार असल्याचेही सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार वकार यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा कठोर अहवाल तयार केला आहे. एका सूत्राने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, वकार यांनी खेळाडूंच्या कामगिरीचा गंभीर अहवाल दिला असून, बहुतेक खेळाडू प्रशिक्षकाच्या सूचनेनुसार प्रदर्शन करण्यात अपयशी ठरले असल्याचेही सांगितले आहे. वकारने अधिक माहिती देताना सांगितले की, ‘‘काही खेळाडू अधिक मेहनत करण्यास किंवा कोचिंग स्टाफला सहकार्य करण्यास तयार नाहीत’’, अशी माहितीही सूत्रानी दिली.तथ्य अन्वेषण समितीची तीन दिवसीय बैठककसोटी कर्णधार मिसबाह उल हक आणि वरिष्ठ फलंदाज युनिस खान यांचा समावेश असलेल्या या समितीला पीसीबीने विशेष निर्देश देताना पाकिस्तानचा कर्णधार, प्रशिक्षक, संघव्यवस्थापक आणि वरिष्ठ खेळाडूंशी भेटून चर्चा करण्याचे अधिकार दिले आहेत. याआधी समिती वकार यांनी दिलेल्या अहवालाचा अभ्यास करणार असून त्यानंतर योग्य ती पावले उचलेल, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संघात मोठे बदल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.देशाची माफी मागतो : वकारटी-२० विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर टीकेला सामोरे जात असलेला प्रशिक्षक वकार युनिस यांनी यासाठी पाकिस्तानची माफी मागताना स्वत:हून प्रशिक्षक पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. स्पर्धेत गटसाखळी फेरी पार करण्यात संघाला अपयश आल्यानंतर खेळाडूंसह प्रशिक्षकावर मोठी टीका झाली. दरम्यान, कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर तर संघाची कामगिरी अधिकच खालावली. पीसीबीच्या मुख्यालयात वकार यांनी जाहीरपणे माफी मागताना सांगितले की, ‘‘मी देशाची हात जोडून माफी मागतो. जर माझ्या दूर जाण्याने सर्वकाही सुधारणार असेल, तर मी यासाठी कोणताही विलंब करणार नाही.’’आफ्रिदीच्या नेतृत्वावर वकार यांचे प्रश्नचिन्हशाहिद आफ्रिदीच्या नेतृत्त्वाबाबत वकार नाराज असल्याची माहिती मिळाली असून याबाबत सूत्राने सांगितले की, ‘‘वकार यांनी आफ्रिदीच्या नेतृत्वकौशल आणि काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. एकूणच संघाचे प्रशिक्षक स्पष्टपणे खेळाडूंवर नाराज आहेत.’’ पीसीबी अध्यक्ष शहरयार यांनी हा अहवाल पुढील तपासणीसाठी पाठवला आहे. या अहवालावरुन आशिया चषक, टी२० विश्वचषक यासह इंग्लंड व न्यूझीलंडविरुध्द मालिकेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे विश्लेषण होणार आहे. त्यानंतरच इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड होईल.
वकार युनिस यांनी पीसीबीला दिला अहवाल
By admin | Published: March 30, 2016 2:43 AM