नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबाद संघाचा मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मणने कर्णधार डेव्हिड वॉर्नरची मुक्तकंठाने प्रशंसा केली. वॉर्नरने नेतृत्व करताना सनरायझर्स संघाला आयपीएलमध्ये प्रथमच जेतेपदाचा मान मिळवून दिला. वॉर्नरने युवा खेळाडूंना प्रेरित केले, असेही लक्ष्मणने म्हटले आहे. सनरायझर्सने रविवारी रात्री अंतिम लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पराभव करीत आयपीएलच्या नवव्या पर्वात जेतेपदाचा मान मिळवला. लक्ष्मणने वॉर्नरची प्रशंसा करत स्पर्धेच्या वेबसाइटवर म्हटले की,‘वॉर्नरने शानदार नेतृत्व केले. तो प्रेरणादायी खेळाडू आहे. तो सकारात्मक असून आक्रमकही आहे. त्याच्या वर्तनामुळे अनेक युवा खेळाडू प्रभावित झाले. दडपण असतानाही त्याने चांगली फलंदाजी केली, ही बाब प्रशंसेस पात्र आहे.’वॉर्नर सनरायझर्सतर्फे सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज आहे. त्याने ६०.५७ च्या सरासरीने धावा फटकावल्या असून, त्यात ९ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. लक्ष्मण पुढे म्हणाला, ‘वॉर्नरची प्रत्येक लढतीतील कामगिरी प्रभावित करणारी आहे. तो खऱ्या अर्थाने गोलंदाजांचा कर्णधार आहे. तो आपल्या गोलंदाजांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. ज्या वेळी परिस्थितीवर नियंत्रण नसते, त्या वेळी तुम्हाला कर्णधाराच्या समर्थनाची गरज असते. आमच्या गोलंदाजांना कर्णधाराकडून समर्थन मिळाले. वॉर्नर केवळ अनुभवी नसून त्याने योग्य पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. तो भविष्यातही कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. तो मॅचविनर असून, आमच्यासाठी शानदार कर्णधार आहे.’ (वृत्तसंस्था)भुवनेश्वर विश्वदर्जाचा गोलंदाज : वॉर्नरबेंगळुरू : आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक बळी घेणारा भुवनेश्वर कुमार जागतिक दर्जाचा गोलंदाज असल्याची प्रतिक्रिया सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केली. रविवारी जेतेपदाचा मान मिळवल्यानंतर प्रतिक्रिया देताना वॉर्नर म्हणाला, ‘भुवनेश्वर भारतीय संघात आत-बाहेर होत असला तरी तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. सलामीवीर म्हणून नव्या चेंडूने अशा प्रकारच्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाण्यास इच्छुक आहे. तो पहिल्याच चेंडूवर सामन्याचे चित्र निश्चित करतो. कर्णधार म्हणून मला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.’लक्ष्मणचे मार्गदर्शन लाभले : भुवनेश्वरबेंगळुरू : आयपीएलच्या नवव्या पर्वातील सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे मनोधैर्य ढासळले होते; पण व्हीव्हीएस लक्ष्मणचे मार्गदर्शन लाभल्यामुळे कामगिरी सुधारता आली, अशी प्रतिकिया स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेल्या भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली. भुवनेश्वर म्हणाला, ‘सुरुवातीच्या दोन लढतीतील कामगिरीमुळे निराश झालो होतो; पण मेंटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांची चांगली मदत झाली. लक्ष्मण यांनी मला सामना जिंकून देणारा खेळाडू असल्याचे सांगत स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. मी गोलंदाजीवर मेहनत घेतली आणि स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजीत सुधारणा केली. नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा लाभ मिळाला. मुस्तफिजुर रहमानच्या साथीने गोलंदाजी करण्याचा अनुभव चांगला होता. त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणे कठीण असते. त्याच्या भात्यात आॅफकटर आणि यॉर्कर ही भेदक अस्त्रे आहेत. त्याचा स्लोअर वन चेंडू समजणे अडचणीचे आहे. तो प्रतिभावान गोलंदाज आहे.’
वॉर्नरने युवा खेळाडूंना प्रेरित केले
By admin | Published: May 31, 2016 3:38 AM